सक्षम सागरी परिसंस्थेसाठी एकात्मिक विकास महत्वाचा – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    - Advertisement -

    • आंध्रच्या बंदर मॉडेलचा अभ्यास

    मुंबई, दि. ८ : बंदर विकासाला कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, मत्स्यव्यवसाय आणि किनारी पर्यटनाची जोड देऊन महाराष्ट्राची सागरी परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या एकात्मिक विकास मॉडेलमधील उपयुक्त बाबींचा अभ्यास करण्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भर दिला. आंध्र प्रदेशच्या सागरी आणि बंदर-केंद्रित विकास परिसंस्थेच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मंत्री राणे यांनी आंध्र प्रदेशचे बंदरे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

    आंध्र प्रदेशातील ग्रीनफिल्ड बंदरांचा विकास, जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्लस्टर्स, आधुनिक मत्स्यबंदरे, अंतर्देशीय जलमार्ग, वॉटर मेट्रो, किनारी पर्यटन, बंदरांची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांबाबत बैठकीत सादरीकरण झाले. बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देणाऱ्या उपक्रमांची माहितीही मंत्री राणे यांनी घेतली.

    बंदरे, उद्योग, मत्स्यव्यवसाय, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, कनेक्टिव्हिटी आणि किनारी अर्थव्यवस्था यांना जोडणाऱ्या एकात्मिक सागरी विकास मॉडेलवर यावेळी चर्चा झाली. बंदर विकासासह संबंधित उद्योग, रोजगारनिर्मिती, मत्स्यव्यवसाय आणि किनारी भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.

    यावेळी आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण आदित्य, मुख्य अभियंता राघव राव, पोर्ट ऑफिसर कॅप्टन धर्मा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता मनीष मेटकर यांच्यासह दोन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    ०००००

    मनिषा सावळे/विसंअ

    - Advertisement -