चांदिवली प्रकल्पात नववा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ११ : ‘पोषणाचा अधिकार, सुदृढ भारताचा आधार’ या संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, चांदिवली प्रकल्पांतर्गत असल्फा, नारायणनगर बीट क्रमांक 5 आणि नौपाडा बीट क्रमांक 6 येथे नववा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पोषण आहाराचे महत्त्व, कुपोषण प्रतिबंध, माता व बाल आरोग्य तसेच शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली.

    कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका अश्विनी गांगरकर यांनी प्रस्ताविकेत अंगणवाडी आणि बीट स्तरावर राबविण्यात आलेल्या पोषणविषयक उपक्रमांचा आढावा सादर केला. ‘आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी’ आणि ‘पौष्टिक भारत, सशक्त भारत’ या संकल्पनांवर आधारित पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तयार केलेल्या पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विविध भाज्या, कडधान्ये आणि फळांच्या माध्यमातून पोषणमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आकर्षक रांगोळी, सजावट आणि घोषवाक्यांच्या माध्यमातूनही पोषणविषयक संदेश देण्यात आले.

    मुलींच्या जन्माचे स्वागत, अन्नप्राशन, ओटीभरण आणि किशोरवयीन मुलींच्या वयात येण्याशी संबंधित कार्यक्रमांतर्गत बालके व मातांचे औक्षण करून त्यांचा गौरव करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना भेटवस्तू आणि ‘पहिले १००० दिवस’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. घाटकोपर मुंबई डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ येवले यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

    राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत असल्फा आणि नौपाडा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितपणे नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केली. नारायणनगर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवर आधारित पथनाट्य सादर करून योजनेविषयी जनजागृती केली. किशोरी त्रिशा तांबे हिने नृत्य सादर केले. तिरंग्याच्या वेशभूषेत घोषवाक्ये आणि नाटिकेच्या माध्यमातून पोषणविषयक विचार प्रभावीपणे मांडण्यात आले. नऊ दुर्गांच्या रूपातून पोषणयुक्त आहारातील विविध घटक आणि त्यांच्या पोषक तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करणारी अन्नपूर्णेची संकल्पना साकारण्यात आली. यावेळी पोषणगीतही सादर करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

    कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी कुपोषणावर मात करणे हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य असल्याचे सांगितले. अंगणवाडी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जनसमुदायाचा सहभाग महत्त्वाचा असून, मातागटांच्या बैठका, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका पद्मा मलवळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांदिवली प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मुख्यसेविका अक्षता कोरगावकर, लीना मांडेलकर, माधुरी लकडे, प्रिया मोरे आणि धनश्री कोडावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    000

    श्रध्दा मेश्राम/विसंअ

     

    - Advertisement -