मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्वपूर्ण ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ११ : मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत ब्लूमबर्गचे माईक ब्लूमबर्ग यांचे स्वागत करताना त्यांनी महाराष्ट्रातील ब्लूमबर्गच्या योगदानाचे कौतुक केले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्लूमबर्गचे माईक ब्लूमबर्ग यांची मुंबईतील हॉटेल सेंट रेजिस येथे भेट घेतली. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ढवसे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक उपस्थित होते.
    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ब्लूमबर्गने भारतात ३० वर्षे पूर्ण केली असून या प्रवासात महाराष्ट्राचे विशेष स्थान आहे. ब्लूमबर्गचे मुख्यालय महाराष्ट्रात असून, मुंबई आणि पुणे येथेही कंपनीची कार्यालये आहेत, ही अभिमानाची बाब आहे. पुण्यात संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ ब्लूमबर्ग टर्मिनल्सच्या निर्मितीसाठी कार्यरत आहेत. माईक ब्लूमबर्ग यांच्याशी आपली २०१४ मध्ये झालेली पहिली भेट आणि २०१८ मध्ये त्यांच्या कार्यालयाला दिलेली भेट आजही स्मरणात असल्याचे सांगत, त्यांनी केलेले स्वागत आणि त्यांच्याशी झालेला संवाद हा शिकण्याचा अनुभव होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    महाराष्ट्र शासन आणि ब्लूमबर्ग यांच्या भागीदारीतून रस्ते सुरक्षा, आरोग्यविषयक माहिती व्यवस्था, निरोगी शहरे आणि प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यासाठी ब्लूमबर्गने दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत मेट्रोचे जाळे केवळ ११ किलोमीटर होते; आता सुमारे ३५० किलोमीटरचे मेट्रो जाळे विकसित केले जात आहे. त्यापैकी १०० किलोमीटरचे मार्ग कार्यान्वित झाले असून, पुढील वर्षापर्यंत आणखी ७० किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. २०२९-३० पर्यंत संपूर्ण मेट्रो जाळे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील अनेक शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होत असून, पुण्यातही मेट्रोचे विस्तृत जाळे विकसित केले जात आहे. द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन दिल्यास नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ब्लूमबर्ग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानत, त्यांच्या सहकार्यामुळे विविध विकासात्मक उपक्रमांना बळ मिळत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

    भारतातील ३० वर्षांच्या व्यावसायिक प्रवासासह सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा अभिमान – माईक ब्लूमबर्ग
    महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे आर्थिक राज्य असून, भारतात व्यवसायाची ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, मुंबईने व्यवसायाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे मायकल ब्लूमबर्ग यावेळी म्हणाले. भारतात व्यवसाय सुरू केला, तेंव्हा छोट्याशा सामायिक जागेतून कामकाजाला सुरुवात झाली होती, मात्र आज भारतातील व्यवसायाचे मुख्यालय मुंबईत आहे. मुंबईसह देशभरात कंपनी सातत्याने गुंतवणूक करत असून, पुण्यात १०० हून अधिक अभियंते कार्यरत आहेत. पुण्यात उभारण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी केंद्राचा भविष्यात आणखी विस्तार करण्याची योजना आहे. कंपनीची भारताप्रती असलेली बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून, गेल्या जवळपास २० वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य, रस्ते सुरक्षा, स्वच्छता आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांतील विविध उपक्रमांना सहकार्य केले जात आहे. भारतासह महाराष्ट्र राज्यात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत, येथील नागरिकांसाठी उपयुक्त उत्पादने विकसित करण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

    000

    - Advertisement -