
रायगड-अलिबाग, दि. १२ : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस व होमगार्डची गस्त वाढवावी. धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे स्पष्ट सूचना फलक लावावेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आपदा मित्रांची मदत घ्यावी, त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण द्यावे आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्ह्यातील सागरी किनारा सुरक्षा, व्यवस्थापन आणि उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गोगावले म्हणाले, जिल्ह्यात एकूण 31 समुद्रकिनारे असून, त्यापैकी 28 किनारे सुरू असून 11 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा. तसेच, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी पर्यटन मित्र नियुक्त करण्याबाबतही प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
समुद्रकिनाऱ्यांवरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणांची ओळख करून तेथे आवश्यक सूचना फलक लावावेत. गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि होमगार्डची गस्त वाढवून पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. आपदा मित्रांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करून घ्यावे. बचावासाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामग्री उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.
बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
00000000

WhatsApp