
मुंबई, दि. १३ : बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि शेतीसमोरील विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती, पीक विविधीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्व प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने बांबू लागवडीची क्षमता, त्याचे आर्थिक महत्व, मूल्यवर्धनाच्या संधी आणि पर्यावरण संवर्धनातील योगदान याविषयी माहिती देणारी विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतून प्रसारित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी या मुलाखतींच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, १५, शुक्रवार, १६ आणि शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘News On AIR’ ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून, महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे:
Twitter : MahaDGIPR
Facebook : MahaDGIPR
YouTube : MaharashtraDGIPR
या मुलाखतीत बांबू लागवडीचे आर्थिक व पर्यावरणीय महत्व, बांबूपासून फर्निचर, बांधकाम साहित्य, हस्तकला आणि पॅकेजिंग यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या संधी, तसेच प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि सक्षम मूल्यसाखळीच्या विकासासंदर्भातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बांबू आधारित उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक उपक्रमांना चालना देण्याची क्षमता आणि स्थानिक संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या शक्यतांचीही माहिती या संवादातून मिळणार आहे.
बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी पीक विविधीकरण, जलसंधारण, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब यांचे महत्त्वही या मुलाखतीतून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बांबू लागवडीपासून त्यावरील प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंतच्या संधींची माहिती ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देण्यात आली आहे.
0000
जयश्री कोल्हे/स.सं.

WhatsApp