
मुंबई, दि. १९: दुर्गापूजा हा सर्व धर्म, वर्ण आणि समाजातील लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. दुर्गापूजा सामाजिक एकता, आनंद आणि बंधुभावाचा संदेश देते. सर्वांनी आनंदात आणि सुरक्षितपणे दुर्गापूजेचा उत्सव साजरा करावा, तसेच मा दुर्गेची कृपा सर्वांवर राहो, अशा शुभेच्छा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिल्या.
जुहू येथील स्पोर्ट्स ग्राउंडवर बंगाल कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित दुर्गापूजा समारोहाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्गापूजेच्या निमित्ताने उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. बंगाली भाषेचे दुर्गापूजेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी बंगाली आणि हिंदी भाषिकांमधील भाषिक सलोख्याचाही उल्लेख केला. दुर्गापूजेचा उत्सव संपल्यानंतर बंगाली समाज पुढील वर्षाच्या पूजेच्या तयारीला लागतो, असे नमूद करत त्यांनी या उत्सवाशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व सांगितले. यावेळी बंगाल कल्चरल असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णेंदू सेन उपस्थित होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा दुर्गापूजेच्या विधीमध्ये सहभागी झाले.
दुर्गापूजा मंडपातून ‘नशामुक्त भारत’चा संदेश
युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जनजागृती रॅली व विविध कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दुर्गापूजेच्या मंडपातही ‘से नो टू ड्रग्ज’ चा संदेश देऊन उपस्थितांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.
जिओ वर्ल्ड येथे नवरात्रोत्सवात राज्यपालांचा सहभाग
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील जॅस्मिन हॉलमध्ये आयोजित फाल्गुनी पाठक यांच्या ‘नवरात्रोत्सव २०२६’ कार्यक्रमालाही भेट दिली. या कार्यक्रमात त्यांनी देवीची विधिवत पूजा केली तसेच आरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी माजी खासदार मनोज कोटक, गायिका फाल्गुनी पाठक आणि आसिफ भामला उपस्थित होते.
या कार्यक्रमातही राज्यपालांच्या उपस्थितीत ‘से नो टू ड्रग्ज’ अर्थात अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपत युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
००००

WhatsApp