
- बाह्यरुग्ण तपासणीसह घरभेटी, टेलिमेडिसिन आणि १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांवर भर
मुंबई, दि ३० : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या कामकाजासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार उपकेंद्र स्तरावरील आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नियमित बाह्यरुग्ण सेवा, गावभेटी, गृहभेटी, टेलि मेडिसिन, विविध आजारांची तपासणी आणि आवश्यक प्राथमिक उपचार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा संकल्पनेनुसार आरोग्य उपकेंद्रांचे आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या केंद्रांमधून नागरिकांना केवळ उपचारच नव्हे, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आजारांचे लवकर निदान, आरोग्य संवर्धन आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे.
निश्चित वेळापत्रकानुसार आरोग्यसेवा
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयुष्मान आरोग्य मंदिरात बाह्यरुग्ण सेवा देण्यात येणार आहे. या कालावधीत रुग्णांची तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि रक्तदाबासह इतर प्राथमिक तपासण्या केल्या जातील. दुपारी २ ते ४ या वेळेत समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनानुसार गावभेटी व समुदायस्तरीय आरोग्यसेवा राबविण्यात येतील. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गृहभेटी, तर ५ ते ५.३० या वेळेत दिवसभरातील कामकाजाच्या नोंदी आणि संबंधित पोर्टलवरील माहिती अद्ययावत केली जाणार आहे.
शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत बाह्यरुग्ण सेवा तसेच उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सभा, ई-संजीवनी आणि टेलिमेडिसिन सेवांचे नियोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक गावात आरोग्यसेवेचा पोहोच
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दररोज किमान एका गावाला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी २ ते ४ या वेळेत अंगणवाडी केंद्र, प्राथमिक शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयातील उपलब्ध जागेत बाह्यरुग्ण सेवा आयोजित केली जाणार आहे. गावभेटीचे दिवस निश्चित करून त्यामध्ये बदल होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांना या सेवांची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. गावातील गर्भवती माता, स्तनदा माता, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिला, लहान बालके तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांना गृहभेटीद्वारे आरोग्यसेवा व पाठपुरावा केला जाणार आहे.
१४ प्रकारच्या तपासण्या, औषधोपचार आणि टेलिमेडिसिन
आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आवश्यक प्रयोगशाळा तपासण्यांसह अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. ई-संजीवनी व टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा नियमित वापर करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात आवश्यक साहित्य, साधनसामग्री आणि औषधे उपलब्ध असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, उपशामक उपचारांची गरज असलेले रुग्ण, उच्च जोखमीच्या गर्भवती माता, नवजात बालके आणि इतर संवेदनशील गटांच्या आरोग्य तपासणी व पाठपुराव्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण आणि असंसर्गजन्य आजारांच्या तपासण्याही करण्यात येतील.
कामकाजावर नियमित देखरेख
आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक देखरेखीची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दररोज, तालुका आरोग्य अधिकारी साप्ताहिक, तर जिल्हा आरोग्य अधिकारी मासिक स्तरावर कामकाजाचा आढावा घेतील. दैनंदिन बाह्यरुग्ण संख्या, आठवड्यातील बाह्यरुग्ण संख्या, टेलिमेडिसिनद्वारे घेतलेला सल्ला, आजारनिहाय तपासणी, संदर्भित रुग्ण, गृहभेटी आणि योगसत्रांची संख्या यांसारख्या निर्देशांकांच्या आधारे कामगिरी तपासली जाणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक सुधारणा सुचवाव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
| गावागावांत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या निर्णयामुळे आयुष्मान आरोग्य मंदिरे केवळ उपचार केंद्रे न राहता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आजारांचे लवकर निदान आणि आरोग्य संवर्धनाची प्रभावी केंद्रे म्हणून विकसित होण्यास चालना मिळणार आहे.
“आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील डे-केअर ओपीडी सेवेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळच आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्यसेवेसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होऊन वेळेची बचत होऊन मोफत सेवा उपलब्ध होईल. आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून गावोगावी आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू होत असून, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.” अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. |
0000
मनिषा सावळे/विसंअ

WhatsApp