Home शहरे मुंबई मतदारांशी ऋणानुबंध जुळल्याने शिवसेनेत सर्वाधिक मताधिक्य-एकनाथ शिंदे

मतदारांशी ऋणानुबंध जुळल्याने शिवसेनेत सर्वाधिक मताधिक्य-एकनाथ शिंदे

0

ठाणे : मतदारांशी आपले नाते हे फक्त मतदार म्हणून नसून एक वेगळेच ऋणानुबंध जुळले असल्याने शिवसेनेत सर्वाधिक मतांनी आपण विजयी झालो असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातुन एकनाथ शिंदे सुमारे 90 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर ठाण्याच्या कोपरी श्री अष्टविनायक चौकात विजयी मेळावा व दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासमयी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकीत आपण 40 हजार मतांनी निवडून आलो होतो. या निवडणुकीत 90 हजार मताधिक्य मिळवून शिवसेनेच्या सर्व आमदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळविले आहे. ठाणे म्हणजे शिवसेना असे समीकरण असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदींचे मार्गदर्शन व आशिर्वाद असल्याने साध्या शाखाप्रमुख पदापासून नगरसेवक, सभागृहनेता, आमदार, विरोधीपक्ष नेता, पालकमंत्री अशी आपली घोडदौड सुरु आहे आणि हे सर्व फक्त शिवसेनेमध्येच घडू शकते असेही त्यांनी सांगितले.

यासमयी पाचपाखाडी, कोपरी विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. कोपरी शिवसेना शाखेतर्फे खा. राजन विचारे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर मिनाक्षी शिंदे, आ. रविंद्र फाटक, विभागप्रमुख गिरीश राजे, माजी महापौर रमेश वैती, एच. एस. पाटील इत्यांदीसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभागप्रमुख गिरीश राजे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दिपसंध्या कार्यक्रमात अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांनी अनेक गाण्यांवर उपस्थितांची पावले थिरकावली. यासमयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करवून घेतलेली शिवसेनेची सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी रसिकांसमोर सादर केली.