Home ताज्या बातम्या स्मशानभुमीची दुरवस्था; ग्रामपंचायत समोर केला अत्यंविधी

स्मशानभुमीची दुरवस्था; ग्रामपंचायत समोर केला अत्यंविधी

0

‘इतकच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ या सुरेश भटांच्या ओळीच्या उलट प्रचीती आज लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथे आली. शनिवार 26 ऑक्टोबरला सकाळी सुलतानपूर येथील कचरू राघो पनाड (61) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासुन सुरु असलेली पावसाची सतत धार आजही सुरूच होती. गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीय स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता खराब अवस्थेत आहे. तसेच स्मशानभुमीची अपुरी जागा व सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिक संतापले होते. त्यामुळे नातेवाईकांनी व समाज बांधवांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच कचरू पनाड यांचे अंत्यविधी केले.

स्मशानभूमीतील समस्यांबाबत ग्रामपंचायत व संबंधीत प्रशासनाला वारंवार निवेदन दिली. अनेकदा उपोषण व आंदोलनही झाले. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आज कचरू यांच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी अंत्यविधी ग्रामपंचायत सचिवालयासमोर करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत समोर अत्यंविधीचे साहित्य टाकण्यात आले. सदर प्रकाराची माहिती संबंधीत विभागाला होऊन ही कोणीही आधिकारी याबाबत पुढाकार घेऊन मागासवर्गीय स्मशानभुमीच्या रस्ता दुरुस्ती बाबत दखल घेण्यास पुढे आले नाही. अखेर नाईलाजाने दुपारी 3.30 वाजता नातेवाईक समाज बांधव व गावकर्‍यांच्या उपस्थितीत सुलतानपुर ग्रामपंचायत समोर अंत्यविधी विधीवत पणे पार पाडण्यात आला. तर याच ठिकाणी 29 आक्टोबरला सावडण्याचा (जलदानविधीचा) कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने मात्र सुलतानपुर ग्रामपंचायतची अनास्था चव्हाट्यावर आली असुन या प्रकारानंतर प्रशासन मागासवर्गीय स्मशानभुमीच्या दुरवस्थेबाबत काय भुमिका घेते याकडे लक्ष लागुन आहे.

चौकट
मागासवर्गीय समाजाचे सरपंच असुन ते फक्त नावापुरते आहेत तर लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधीत्व करतांना अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत जागृक राहुन मार्गी लावायला पाहिजे मात्र लोकप्रतिनिधी जाणिवपुर्वक या समस्यांकडे डोळेझाक करित असल्याचे दिसुन येते. मागील पंधरा दिवसात मागासवर्गीय समाजात दोन मृत्यू झाले स्मशानभुमीच्या अशा दुरावस्थेमुळे एक प्रेतयात्रा ४ किलोमिटर शेतात न्यावी लागली तर दुसर्‍या प्रेतयात्रे दरम्यान प्रेत रस्ता व्यवस्थीत नसल्याने दोन वेळेस खाली पडता – पडता राहले होते हे विशेष.