पाण्याची बचत हीच गुरुकिल्ली – महासंवाद

    - Advertisement -

    दुष्काळाच्या झळा आताशा तीव्र नाहीत. अजूनही वातावरणात हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीचा गारवा आहे.सूर्याचा कोप तरी अद्याप जाणवत नाही. शेतकरी हा दुष्काळाचा सामना करणारा पहिला घटक असला तरी संपूर्ण समाजच त्याच्या कवेत येणार हे चित्र दिसत आहे. पाणीटंचाई हा त्याचा पहिला चटका असेल. त्याची तीव्रता आतापासूनच छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात जाणवत आहे. शहरात व जिल्ह्यात अनेक भागात आताच टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा मुकाबला करतांना पाण्याची बचत हीच खरी गुरुकिल्ली असणार आहे.

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आताच ६६ गावांमध्ये ७४ विहीर अधिग्रहित केल्या आहेत.११९ गावे आणि ३४ वाड्यांसाठी १७९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे हे नियोजन काटेकोर आणि काटकसरीने करणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा मुख्य जलस्रोत असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ६९.७९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यातून रब्बीसाठी आवर्तनेही सोडण्यात येत आहेत. कारण अन्नसुरक्षाही महत्त्वाची आहे. नुकतेच दोन्ही कालव्यांतून ३३०० क्युसेस विसर्ग (उजव्या कालव्यातून ११०० तर डाव्या कालव्यातून २२०० क्युसेस प्रमाणे) रब्बीसाठी सुरु करण्यात आला असून मराठवाड्यातील ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होईल.  हे क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा(विशेषतः पैठण तालुका), जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील असेल. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वाचवण्यात यश येईल.

    जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी जिल्हास्तरीय पाणी टँकर संनियंत्रण व प्रत्यक्ष पाहणी समिती गठित करून पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि अचूकता आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

    प्रत्यक्ष गरजेनुसार पुरवठा

     ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या संभाव्य टंचाई कालावधीचा विचार करून ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. पाणी पुरवठा प्रत्यक्ष गरजेनुसार व्हावा, यासाठी प्रशासनाने निकष निश्चित केले आहेत. संबंधित गावाची किंवा वाडी-वस्तीची लोकसंख्या विचारात घेऊन दरडोई प्रतिदिन २० लिटर पाण्याच्या निकषानुसार आवश्यक पाण्याचे प्रमाण निश्चित केले आहे.

    ग्रामसभेचा ठराव आवश्यक

     यासोबतच पशुधनाच्या पाण्याची गरजही विचारात घेतली जाणार आहे. टँकरची मागणी करण्यापूर्वी ग्रामसभेचा अधिकृत ठराव आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनात ग्रामस्थांचा सहभाग वाढणार असून स्थानिक गरजांचे वास्तव चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होईल.पाणीपुरवठ्याच्या नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकृत शासकीय अथवा खासगी टँकरवर जीपीएस उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकरच्या प्रत्येक खेपेची नोंद, प्रवासाचे अंतर आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यांची पडताळणी करणे शक्य होईल.

    प्रत्येक खेपेची नोंद

    टँकरच्या खेपांची डिजिटल नोंदवही ठेवण्यात येणार असून गावात पाणी पोहोचल्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीने त्याची खात्री केली जाईल. जीपीएस नोंदी आणि प्रत्यक्ष भरलेल्या पाण्याची पडताळणी केल्याशिवाय टँकरचे देयक अदा केले जाणार नाही.या व्यवस्थेमुळे शासकीय निधीचा योग्य विनियोग होण्यास मदत होईल. विशेषतः कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यांतील तफावत टाळण्यासाठी ही कार्यपद्धती उपयुक्त ठरणार आहे.

    प्रत्यक्ष पडताळणी व संनियंत्रण

    ज्या ज्या गावांमध्ये पाण्यासाठी टॅंकरची मागणी असेल त्या गावांमध्ये ग्रामपंचायतींना जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे. शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलपुनर्भरणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे.प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित संनियंत्रण व्हावे यासाठी जिल्ह्यात कार्यरत टँकरची अचानक तपासणी करण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन मंजूर खेपा, प्रत्यक्ष पाणीपुरवठा, जलस्रोतांची स्थिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील नोंदींची पडताळणी करतील.  हे संनियंत्रण अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे सदस्य, तर तहसीलदार (नियोजन व आपत्ती व्यवस्थापन) सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

    कारवाईची तरतूद

    टँकरच्या खेपांमध्ये अनियमितता, बनावट नोंदी किंवा आदेशाचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

    खरी गुरुकिल्ली

    दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याचे नियोजन हे प्रथम केले जाते. त्याप्रमाणे प्रशासनाने हे नियोजन केले आहे. जसजशी तीव्रता वाढेल त्याप्रमाणे नियोजन अधिक व्यापक केले जाईल. पण या सर्व काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत लोकशिक्षण करुन लोकांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व रुजविणे हे सुद्धा आवश्यक आहे. कारण प्रश्न प्रत्येकाच्या सवयीचा आहे. ती सवय बदलून पाणी बचत अंगवळणी पाडणे आवश्यक आहे. पाणी पुरवून वापरणे हीच दुष्काळाच्या मुकाबल्याची खरी गुरुकिल्ली असेल.

    माहिती संकलन

    जिल्हा माहिती कार्यालय,

    छत्रपती संभाजीनगर.

    - Advertisement -