Home ताज्या बातम्या सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची धूम

सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची धूम

0

सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची धूम

‘लक्ष लक्ष दीपाची तू दीपावली घेऊन ये नववैभव या साली’ असे म्हणत दिवाळीच्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली. पावसामुळे निर्माण झालेले नाराजीचे सावट दूर होऊन पाऊस गेल्यामुळे अतिशय आनंदात अभ्यंगस्नान झाले, दिवाळीचा पाडवा आणि बहीण-भावांचा आवडीचा सण भाऊबीज साजरी होईल, त्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची धूम आहे .

वेगवेगळय़ा प्रकारे शुभेच्छा संदेश देण्याची एक प्रकारे स्पर्धाच सोशल मीडियावर दिसत आहे .जुन्या पद्धतीच्या टेक्स्ट व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेजबरोबरच यावेळी स्टिकर मेसेजचाही पाऊस प्रत्येकाच्या मोबाईलवर पडू लागला आहे . या मेसेजमध्ये प्रामुख्याने आकाशदिवे, पणत्या आणि दिवाळीचा फराळ यांचा समावेश होतोय, 

दिवाळीचे शुभ संदेश देण्याची पद्धत आजची नाही, अनेक वर्षांपासूनची आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून शुभेच्छा संदेश देण्याची पद्धत पूर्वापार जपली जाते. पूर्वी नजराणे देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जायच्या. कालांतराने यात बदल झाला आणि शुभेच्छा संदेश किंवा शुभेच्छा कार्ड आले. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता येत नसतील तर दिवाळीला खास ग्रीटिंग पाठवण्याची पद्धत रूढ झाली. पोस्टाच्या जमान्यात पोस्टाने येणाऱया शुभेच्छा संदेशांची संख्या मोठी होती.

याचबरोबरीने मिठाई आणि भेटवस्तू देण्याची पद्धत रूढ झाली होती. मात्र सोशल मीडिया जोमाने पसरू लागल्यानंतर प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा संदेश किंवा भेटवस्तू देण्यापेक्षा वेगवेगळय़ा कल्पना लढवून रंगीबेरंगी संदेश देण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. दिवाळीचा आनंद उत्साह आणि खरेदीचा मुहूर्त हे सारे साध्य करताना या सणाला सर्वजण खरेदी करून आपापल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. लक्ष्मी पूजन करून या सणाला माता लक्ष्मीकडे धनधान्य वैभव ऐश्वर्य देण्याची मागणी केली जाते .

हे सारे मागत असताना आपल्याबरोबरच इतर सारे सुखी व्हावेत, ही भावना असते. या भावनेचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटत आहे. शुभेच्छांचा पाऊस हा मनाला सुखद गारवा देणारा असतो. मात्र यात मोबाईलच्या बॅटरी आणि स्टोअरेज भरून जाऊ लागले आहे, या भरून जाणाऱया शुभेच्छा पुन्हा इकडेतिकडे फॉरवर्ड करण्यात सर्वजण गुंतलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्यातील मजा मात्र हरवून गेली की काय अशी एक परिस्थिती पाहायला मिळते, या पार्श्वभूमीवर दिवाळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होणार, हे नक्की !