Home गुन्हा मालकाला मुलगा झाला सांगून मोफत साडीवाटपाच्या नावाखाली फसवणूक

मालकाला मुलगा झाला सांगून मोफत साडीवाटपाच्या नावाखाली फसवणूक

0

मुंबई : मालकाला मुलगा झालाय. म्हणून मोफत साडीवाटप करत असल्याचे सांगून, महिलांची फसवणूक करणाऱ्या ठगाला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. बाबू रमेश पवार (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पवार हा भांडुपचा राहणारा असून, त्याचे सध्या पसार असलेले साथीदार सुरेश आणि राजा यांच्यासोबत मिळून तो महिलांची फसवणूक करायचा. बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा त्याच्या दोन साथीदारांसोबत रस्त्यात किंवा निर्जनस्थळी पायी जाणाऱ्या महिलांना गाठायचा. ‘माझ्या मालकाला मुलगा झाला, त्यामुळे त्यासाठी ते साडी वाटत आहेत,’ असे सांगत त्यांना साडी देऊ करायचा. त्या दरम्यान हात चलाखीने महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन पसार व्हायचा. बोरीवलीमध्येही या टोळक्याने असा प्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पोलीस त्याचा शोध घेत होते. तो बोरीवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे यांनी पथकासह पवारच्या मुसक्या आवळल्या. २०१७ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.