Home शहरे अकोला जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रियेमुळे पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगार निर्मिती – वस्त्रोद्योग मंत्री सावकारे

जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रियेमुळे पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगार निर्मिती – वस्त्रोद्योग मंत्री सावकारे

जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रियेमुळे पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगार निर्मिती – वस्त्रोद्योग मंत्री सावकारे


मुंबई, दि. ५ : जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रिया आणि अपसायकलिंग केल्याने पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा व्हिडिओ संदेश प्रदर्शित करण्यात आला.

रिफायबर आणि ओटेररी यांच्या वतीने मुंबईतील वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या कपड्यांच्या कचऱ्याचे संकलन व अपसायकलिंग करण्यासाठी मुंबईत सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सावकारे यांचा संदेश प्रदर्शित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वस्त्रकचऱ्याचे संकलन, पुनर्वापर आणि मूल्यवर्धन करून पर्यावरणपूरक व शाश्वत वस्त्रव्यवस्था निर्माण करणे हा आहे. ५ ते १२ जून या कालावधीत मुंबईभर वस्त्र संकलन मोहीम राबविण्यात येणार असून नागरिक, संस्था आणि विविध गटांना वापरलेले कपडे संकलन केंद्रांवर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी ‘रिफायबर अपसायकल्ड प्रॉडक्ट्स मार्केटप्लेस’चे उद्घाटनही करण्यात आले. टिसरशी संलग्न महिला कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, वस्त्रकचऱ्याचे मूल्यवर्धन करत महिलांसाठी रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई यांनी वस्त्र पुनर्वापर आणि सर्क्युलॅरिटी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत घरगुती स्तरावर निर्माण होणाऱ्या वस्त्रकचऱ्याचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली. सरकार, उद्योग आणि नागरिक यांच्या सहभागातून वस्त्रकचऱ्याचे मौल्यवान संसाधनात रूपांतर करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

टिसरच्या संस्थापक डॉ. मेघा फणसळकर यांनी वस्त्र अपसायकलिंगद्वारे टाकाऊ कापडांपासून उपयुक्त उत्पादने तयार करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. रिफायबर आणि ओटेररीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वनवारी यांनी तंत्रज्ञानाधारित प्लॅटफॉर्म आणि संकलन नेटवर्कच्या माध्यमातून वस्त्रकचऱ्याचा पुनर्वापर अधिक सुलभ व प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) चे अध्यक्ष संजय कटारिया यांनी हा उपक्रम कचऱ्याचे संधीत रूपांतर करणारी व्यापक चळवळ असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, सीएमएआय चे संतोष कटारिया, यूएनआडीओचे डॉ. पंकज कुमार, लायन्स इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनोज बाबूर, ग्रासिम इंडस्ट्रीजचे सूर्या वल्लुरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भारतातील वस्त्रोद्योगात सर्क्युलॅरिटी, नवकल्पना आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सरकार, उद्योग, विकास संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे प्रभावी उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

0000

 

 



Source link

error: Content is protected !!
WhatsApp chat