तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना
- Advertisement -


मुंबई, दि. ५ : तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेचा उद्देश तृतीयपंथीयांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे तसेच सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यासोबतच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणालाही या योजनेमुळे बळ मिळणार आहे.

योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे. लघु कर्ज योजनेत २५ हजार रुपयांपर्यंत, मध्यम कर्ज योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत तर दीर्घ कर्ज योजनेत २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. प्रत्येक योजनेत लाभार्थ्याचा हिस्सा पाच टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि बँक कर्ज ५० टक्के या प्रमाणात निधीची रचना करण्यात आली आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचाही विशेष लाभ मिळणार आहे.

या योजनेद्वारे भाजी स्टॉल, चहा व स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स व लेमिनेशन सेंटर, फूड स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या निर्मिती, स्टेशनरी दुकान, मिनी मालवाहतूक टेम्पो, जनरल स्टोअर्स, आईस्क्रीम फॅक्टरी, ज्यूस सेंटर, बेकरी, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन व मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले निर्मिती, लॉन्ड्री व्यवसाय तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसी, मोबाईल व घरगुती उपकरणे दुरुस्ती यासारख्या विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.

योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्रातील किमान १० वर्षांचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ५० वर्षे असावे. सक्षम प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले तृतीयपंथीय ओळखपत्र, व्यवसाय करण्यास सक्षम असणे गरजेचे, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच व्यवसायाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. यापूर्वी इतर कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अटही घालण्यात आली आहे.

ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालयामार्फत राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी तालुका समन्वयक व्यंकटी तोगरे यांच्याशी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे किंवा मोबाईल क्रमांक ८२९१७८८७५७ वर संपर्क साधावा. मुंबई शहरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यांना प्रसिद्धी  पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

शैलजा पाटील/ विसंअ



Source link

- Advertisement -