Home शहरे अकोला शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज  – राज्यपाल जिष्णु देव वर्मा


मुंबई, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त वांद्रे येथील कार्टर रोड ॲम्फीथिएटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, ‘आजच्या काळात पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी नसून पर्यावरण म्हणजेच विकास आहे,’ असे प्रतिपादन केले.

आपल्या भाषणात राज्यपाल वर्मा म्हणाले की, त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात पर्यावरणवादी कार्यकर्ता म्हणून केली असून ईशान्य भारतातील संस्कृतीत ‘प्रकृती देवो भव’ ही भावना खोलवर रुजलेली आहे. निसर्ग हा दैवी अंश असलेला असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्वी ‘पर्यावरण की विकास’ हा चर्चेचा विषय होता. मात्र आज शाश्वत विकासाची संकल्पना जगभर स्वीकारली जात असून पर्यावरण संरक्षणाशिवाय विकासाची कल्पनाच करता येत नाही. पर्यावरणीय असंतुलनाचा सर्वाधिक फटका समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याची बाब नसून सामाजिक न्यायाची आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.

भारतीय संस्कृती आणि परंपरेत निसर्गाशी सुसंवादाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ‘वनस्पतये शांती’सारख्या प्रार्थनांमधून निसर्गातील शांतता आणि मानवी जीवनातील समृद्धी यांचे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. निसर्गाचे अतिरेकी शोषण केल्यास त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.

पर्यावरण विषय केवळ चर्चासत्रे आणि परिसंवादांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीत उतरविण्याचे आवाहन करताना राज्यपालांनी पर्यावरण संवर्धनाकडे राष्ट्रसेवा आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त केली. नैसर्गिक साधनसंपत्ती ही मानवजातीची सामायिक संपत्ती असून तिचे जतन आणि संवर्धन करणे हे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या चित्रफितीद्वारे शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा संदेश देताना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, मानवजातीच्या शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी भामला फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध उपक्रम आणि अभियानांचे आयोजन केले जाते, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढून निसर्ग संवर्धनासाठी सकारात्मक कृती करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून वृक्षसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नमस्कार भूमी २’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते ‘नमस्कार भूमी २’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच त्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रेरणा गीताचे अनावरण करण्यात आले.

यावेळी राज्यपालांनी ‘भावना फाउंडेशन’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘भूमी नमस्कार’ या प्रेरणादायी गीताचे विशेष कौतुक केले. हे गीत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारे असून व्यापक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्लास्टिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार सचिन अहिर, महाराणा प्रताप यांचे वंशज मेवाडचे श्रीजी लक्षप्रताप महाराज, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक अनिल गायकवाड, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, गौर गोपाल दास अभिनेते सोनू सूद, गायक शंकर महादेवन, अभिनेत्री मलायका अरोरा, रूपा गांगुली, गायक बादशाह, संगीतकार हिमेश रेशमिया, गायिका नेहा कक्कर, सीमा सिंग, विजय कारिया तसेच भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

0000

किरण वाघ/विसंअ



Source link

error: Content is protected !!
WhatsApp chat