मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, १६ जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या अधिकृत माध्यमांवरही ती पाहता येणार आहे. तसेच आकाशवाणीच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २२ आणि २३ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत या मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून गेल्या पाच दशकांतील महामंडळाच्या उल्लेखनीय कार्याचा आणि राज्यातील पर्यटन क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, पर्यटनस्थळांवरील पायाभूत सुविधांचा विकास, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाला दिलेले प्रोत्साहन याविषयी गटने यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
याशिवाय, राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या योजना, तंत्रज्ञानाधारित सुविधा, पर्यटन गुंतवणुकीच्या संधी, तसेच शाश्वत पर्यटन विकासाचा दृष्टीकोन यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी आखण्यात आलेल्या भावी योजनांचा उहापोहदेखील या मुलाखतीत करण्यात आला आहे.
राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाची भूमिका, पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आधुनिक सुविधा आणि आगामी काळातील पर्यटन क्षेत्राच्या वाटचालीविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
0000
जयश्री कोल्हे/स.सं.





















WhatsApp