मुंबई, दि. १९ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने दोन दिवस पाळत ठेवून गुजरात-धुळे महामार्गावर अवैधरित्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर; तसेच अन्य साहित्य असा सुमारे १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ, सुरत-धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा ढाब्याच्या मागे व पार्श्वनाथ ढाब्यालगत करण्यात आली. राज्य दक्षता पथकाने दोन दिवस पाळत ठेवून गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असताना छापा टाकला.
कारवाईदरम्यान गुजरातहून जळगावकडे जाणारा जीजे-०६ एझेड-४४३० क्रमांकाचा एलपीजी गॅस टँकर, त्यातील १७.४२ मेट्रिक टन एलपीजी गॅस, जीजे-१२ बीझेड-७९९९ क्रमांकाचा डिझेल टँकर, त्यातील ३५ किलोलीटर डिझेल, तसेच बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, १३० व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजनकाटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एलपीजी गॅस टँकर व गॅस साठा, डिझेल टँकर व डिझेल साठा, बोलेरो पिकअप, छोटा ट्रक, व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे नॉझल, वजनकाटे आणि इतर साहित्याचा समावेश आहे.ही कारवाई राज्य दक्षता पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांनी केली.अवैध इंधन व गॅस चोरीविरोधातील ही अलीकडील काळातील मोठी कारवाई मानली जात असून, संबंधित आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.
००००
वंदना थोरात/विसंअ





















WhatsApp