सांगली, दि. २८ : मुलांचे आरोग्य आणि सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. निरोगी बालकांमधूनच सशक्त समाज आणि सक्षम राष्ट्र घडते. त्यामुळे संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विश्रामबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजिता मोहपात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार, आरोग्य अधिकारी वैभव पाटील, डॉ. सचिन देसाई, नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, लक्ष्मण नवलाई, नगरसेविका अलका ऐवळे, कीर्ती देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सातत्यपूर्ण लसीकरण मोहिमांमुळे भारत पोलिओमुक्त झाला असला तरी हा आजार पुन्हा डोके वर काढू नये यासाठी प्रत्येक मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी स्वतःच्या मुलांबरोबरच शेजारील कुटुंबांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुलांच्या आरोग्याची काळजी गर्भधारणेपासूनच घेणे आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गर्भवती महिलांसाठी योग्य आहार, योग आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. योगाच्या माध्यमातूनही बाळ गर्भाशयातच असताना त्याच्यावर संस्कार जडवावेत. मुलांच्या काळजीइतके जगात काहीच नाही. यासाठी त्यांचे योग्य संगोपन करणे आवश्यक आहे. महिलांना प्रामुख्याने स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. या दोन्ही कर्करोगावर मात करण्यासाठी लस विकसीत केली आहे. मुलींना प्रतिबंधात्मक लसीकरण देण्याचा उपक्रमही आगामी काळात शाळांमधून राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या लसीकरणानंतर पुढील पाच दिवस घरभेटींद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येणार असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. पोलिओ हा एक घातक आजार आहे, जो मुलांना आयुष्यभरासाठी शारीरिक व्यंग निर्माण करू शकतो. बालकांना वेळेवर दिलेली लस या आजाराला आपल्या मुलांपासून दूर ठेवते. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, खाजगी रुग्णालये, वीटभट्ट्या, ऊसतोड कामगारांची वसाहत तसेच बेघर कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल आणि नाईट टीमचीही नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात कोविड-१९ काळात उल्लेखनीय सेवा बजावताना निधन झालेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी विश्वास कांबळे यांच्या वारसांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, बालके, त्यांच्या माता तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000






















WhatsApp