मुंबई, दि. २: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला उपलब्धतेनुसार आवश्यक पाणीपुरवठा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र, महापालिकेने पाण्याची गळती कमी करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविणे, अनधिकृत नळजोडण्या तातडीने बंद करणे आणि प्रत्येक ठिकाणी वॉटर मीटर बसविणे यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे सचिव जयंत बोरकर, मुख्य अभियंता संजीव चोपडे, सहसचिव सविता बोधेकर तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते.
बैठकीत मंत्री विखे-पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी महापालिकेने पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अनधिकृत नळजोडण्या तातडीने बंद कराव्यात आणि पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वॉटर मीटर बसवावेत. या कामात कुचराई करणाऱ्या संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
००००
एकनाथ पोवार/स.सं.






















WhatsApp