Home पोलीस घडामोडी राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

0

पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत़. याचबरोबर येत्या १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद असल्याने या पार्श्वभूमी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये, यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़. या संबंधितचे आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून आज रात्री सर्व पोलीस अधीक्षक, घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़. सध्या सरकार स्थापन करण्यावरुन दररोज उलटसुलट बातम्या येत असून राज्यातील राजकीय वातावरण विशेषत: शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाला आहे़. भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यास राज्यात त्याविरोधात पडसाद उमटू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे़. कोणाचेही सरकार सत्तारुढ झाले तरी त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़.
मुंबईत शनिवारी राज्यातील सर्व अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़.
पोलीस अधीक्षक आणि घटक प्रमुखांनी बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द कराव्यात असे सांगण्यात आल्याचे समजते़. या बैठकीनंतर रात्री उशिरा पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून रजा, सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश पाठविण्यात आले आहे़. १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद हा सण असल्याने सुट्ट्या रद्द कराव्यात असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे़.
याबरोबरच पुढील आठवड्यात अयोध्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने यावेळीही राज्यभरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. त्यामुळे अयोध्येचा निकाल लागून राज्यातील परिस्थिती शांत राहीपर्यंत पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे़.