बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ
- Advertisement -


बारामती, दि.५: गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्यशासन गती देत आहे. माता-भगिनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात; परंतू स्वतःच्या आरोग्याची तपासणी पुढे ढकलतात. ही मानसिकता बदलली पाहिजे. सकारात्मक, टिकाऊ आणि मोजता येणारा बदल घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, केवळ माहितीच्या अभावामुळे पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, बालक पोषण सेवेपासून दूर राहणार नाही आणि मुलगी अंतर किंवा परिस्थितीमुळे शिक्षण सोडणार नाही या ध्येयाने शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

‘आदिशक्ती’ व ‘टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील एक दशलक्ष विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाचा ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी येथे करण्यात आलेल्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती अमोल नलावडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उप सभापती शुभांगी आगवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे धोरणविषयक सल्लागार डॉ. संतोष भोसले, नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता नाळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था व सीएसआरचे प्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन हजार सायकलींचे वितरण, डिजिटल वर्ग, स्टेम प्रयोगशाळा, विज्ञान-अनुभव कार्यक्रम, शाळांमधील पाणी व स्वच्छता सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सुरू होत आहेत. या प्रत्येक उपक्रमामागे एक समान ध्येय आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण आणि शहरी, मुलगा आणि मुलगी, सक्षम आणि वंचित अशा कोणत्याही भेदांमध्ये अडकू नये. तसेच शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, बँका, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व एकत्र आले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, एका मुलीचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ, एका मातेचे आरोग्य सुरक्षित, एका महिलेचा आत्मसन्मान बळकट करण्यासाठी आणि एका संपूर्ण पिढीचे भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजचा दिवस केवळ सायकली, डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा किंवा विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्याचा दिवस नसून आशेला दिशा देण्याचा, क्षमतेला संधी देण्याचा आणि समतेला समृद्धीशी जोडण्याचा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बारामतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आशा, विश्वास आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा आहे.

मुलींना सायकली उपलब्ध करून दिल्यानंतर माध्यमिक शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढल्याचे आणि मुला-मुलींमधील शैक्षणिक अंतर कमी झाल्याचे अभ्यासांतून दिसून आले आहे. विशेषतः शाळा दूर असलेल्या ग्रामीण भागात सायकल ही अंतर, वेळ आणि सुरक्षिततेशी संबंधित अडथळे कमी करणारे प्रभावी साधन ठरलेले आहे. योग्य साधन आणि संधी मिळाल्यास तर मुलगी केवळ शाळेत पोहोचत नाही; ती स्वतःच्या भविष्यापर्यंत पोहोचते. या सायकलीचा उपयोग नियमितपणे शाळेत जाण्यासाठी करा. वाहतूक नियमांचे पालन करा. शिक्षणात सातत्य ठेवा. एखादी मैत्रीण शिक्षण सोडण्याच्या विचारात असेल, तर तिचा हात धरा, तिच्याशी संवाद साधा आणि तिला पुन्हा शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भारतीय संस्कृतीने स्त्रीला ‘आदिशक्ती’ म्हटले आहे. पण स्त्रीशक्तीचा गौरव केवळ भाषणांत, घोषणांत किंवा सन्मान सोहळ्यांत करून चालणार नाही. तो तिच्या दैनंदिन जीवनात, आरोग्यात, शिक्षणात, सुरक्षिततेत, उत्पन्नात आणि निर्णय घेण्याच्या अधिकारात दिसला पाहिजे. मुलीचा जन्म सन्मानाने व्हावा, योग्य पोषण मिळावे, शिक्षण पूर्ण होण्यासह आरोग्यही सुरक्षित राहिले पाहिजे. तिला कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेची संधी मिळाण्यास आर्थिक साधनांपर्यंत प्रवेश मिळाला पाहिजे. स्वत: च्या आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार, ग्रामसभा, उद्योग, प्रशासन, सार्वजनिक जिवनात नेतृत्वाच्या भूमिकेत पुढाकार घेतला पाहिजे.

‘आदिशक्ती’ हा एका विभागाचा, एका योजनेचा किंवा एका दिवसाचा कार्यक्रम असू शकत नाही. तो आरोग्य, शिक्षण, पोषण, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, उद्योग, ग्रामविकास, नगरविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना जोडणारा जीवनचक्राधारित महिला सक्षमीकरणाचा व्यापक कार्यक्रम असला पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत, गर्भवती मातेची काळजी असो, बालकाचे पोषण असो, लसीकरण असो, आरोग्य तपासणी असो, पूर्वप्राथमिक शिक्षण असो, जनजागृती असो किंवा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देणे असो तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचा. टॅब्लेट, आवश्यक आरोग्य साधने, चष्मे, प्रवासाची साधने, प्रशिक्षण आणि डिजिटल क्षमता उपलब्ध करून देणे ही सार्वजनिक आरोग्य, पोषण आणि बालविकास व्यवस्थेच्या क्षमतेमध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आज सुरु झालेली ही चळवळ प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचो, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.

उद्योग आणि सामाजिक उत्तर दायित्वनिधी संस्थांनी विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन श्रीमती पवार म्हणाल्या, यापुढे केवळ निधी उपलब्ध करून देऊन थांबू नये. एखादा शाळा समूह, गावसमूह, आरोग्य प्रकल्प किंवा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम तीन ते पाच वर्षासाठी स्वीकारावा. प्रशिक्षण, देखभाल, तंत्रज्ञान, रोजगाराशी जोडणी, नवकल्पना आणि परिणाम मापनामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

सुधा मूर्तीच्या संपूर्ण जीवनाकार्यातून आपल्या मोठेपणा पदामध्ये किंवा संपत्तीमध्ये नसतो; तो साधेपणात, संवेदनशीलतेत, ज्ञानात आणि समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्यात असतो, अशी शिकवण मिळते. त्यांचा जीवनसंदेश अत्यंत स्पष्ट आहे साधी मूल्ये, पण समाजावर खोल परिणाम करणारा आहे. स्वाती मालीवाल यांनी महिलांची सुरक्षितता, पीडितांना सहाय्य, मानवी तस्करीविरोधी कारवाई आणि महिलांवरील हिंसाचाराबाबत यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी तक्रारीपासून न्यायापर्यंतची व्यवस्था अधिक संवेदनशील आणि उत्तरदायी करण्याचा प्रयत्न केला. महिलांचा आवाज ऐकण्यासाठी व्यवस्था उपलब्ध असली पाहिजे; परंतू त्याहून त्या आवाजाला वेळेवर, संवेदनशील आणि परिणामकारक प्रतिसाद मिळाला पाहिजे. या दोन्ही कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती आज आपल्या मुलींना आणि माता-भगिनींना एक स्पष्ट संदेश देत आहे स्वप्ने मोठी पाहा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्या स्वप्नांसाठी उभे राहण्याचे धैर्य जोपासा, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

खासदार श्रीमती मुर्ती म्हणाल्या, महाराष्ट्र ही समाज सुधारकांची भूमी असून राज्याचा इतिहास समृद्ध आहे. याचा आपल्या गर्व असला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी समाजनिर्मितीसाठी क्रांतीकारक विचार केला पाहिजे. इतर भाषेसोबतच मातृभाषा शिकलीच पाहिजे. पालकांने मुलांच्या गरजा विचारपूर्वक पूर्ण कराव्यात, मुलांनीही पालकांचा सल्ला ऐकला पाहिजे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीच्या योगदान महत्वपूर्ण आहे. बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धीमत्ता, स्टेम प्रयोगशाळा, पायलट प्रशिक्षणाचा सदुपयोग घेतला पाहिजे. राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांनी मोफत सायकल वाटप करुन दिले पाहिजे, अशी सूचना श्रीमती मुर्ती केली.

श्रीमती मालीवाल म्हणाल्या, केंद्र व राज्यशासन मिळून महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने महत्वाचे कार्यक्रम राबवित आहेत. ‘आदिशक्ती’च्या माध्यमातून वाटप करण्यात येणाऱ्या सायकली महत्वाची बाब असून संपूर्ण देशात याप्रमाणे काम झाले पाहिजे, सायकल हे केवळ शाळेपर्यंत पोहचण्याचे साधन आहे. वेळ वाचविण्याचे माध्यम आहे. सुरक्षा आणि आत्मविश्वासाचे आधार आहे, परिवाराची चिंता कमी करते. मुलीला आत्म निर्भर करण्याचा विश्वास दर्शविते. त्यामुळे सायकल ही साधन नसून मुलींचा सन्मान, संधी, स्वंतत्र्यता आणि आशेचे पाऊल आहे, असेही श्रीमती मालीवाल म्हणाल्या.

श्री. जगदाळे म्हणाले, राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद काम करीत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा विचार सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्यावतीने अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल, श्री. जगदाळे म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ई-प्रशासन या मुख्य घटकांवर काम करण्यात येत आहे. यादृष्टीने जिल्ह्यात मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या १०० दिवस आणि १५० दिवस कार्यक्रम, निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये जिल्हा परिषद प्रथम स्थानी आहे. एकल महिलांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या सक्षमीकरणाच्यादृष्टीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील महिलांकरिता ‘ड्रोन दीदी’, महिला बचतगटाच्या उत्पादन विक्रीसाठी पुणे विमानतळावर हक्काचे दालन उपलब्धता तसेच महिला सुरक्षितेतच्यादृष्टीने मिशन निर्भया अभियान, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांनीसाठी सायकल बँक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांची नासा, इस्रो भेट, राष्ट्रपती भवन भेट, बाल साहित्य संमेलन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

कार्यक्रमात….

शाळा पायाभूत सुविधा हस्तांतरण

यावेळी जिल्हा परिषदेच्या २४० पेक्षा अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्यांचे हस्तांतरण, ८० पेक्षा अधिक शाळांमध्ये स्टेम (एसटीइएम) प्रयोगशाळा तसेच १० शाळांमध्ये पीआय प्रयोगशाळा, जि. प. शाळा वढाणे केंद्र सुपे आणि ८ शाळांमध्ये ‘वॉश’(पाणी, स्वच्छता व शौचालय) सुविधांचे हस्तांतरण करण्यात आले. ‘आदिशक्ती’ व ‘टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक’ उपक्रमाअंतर्गत २ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद आणि विविध संस्थांमध्ये सामंजस्य करार

यावेळी जिल्हा परिषद व विविध संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यात ‘आयुका’समवेत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना नासा, इस्रो, ईसा (युरोपियन स्पेस एजन्सी) संस्थांना शैक्षणिक भेट उपक्रम बाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीबरोबर विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमबाबत, ‘टीस’समवेत (टीआयएसएस) ग्लोबल गुरुजी प्रोग्रामबाबत, देश अपनाये सहयोग फाऊंडेशनसमवेत बाल संसद उपक्रमाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच ‘सेलको’ समवेत अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सौर विद्युतीकरणबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी हस्तलिखित केलेल्या पुस्तकांचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी ‘पायलट स्कॉलरशिप’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली. ‘गर्भाशयमुख कर्करोगमुक्त पुणे’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच विस्तारित ‘MAATR’ ॲपचे उद्घाटन तसेच ‘आशा गाथा’ या महिला सक्षमीकरण गीताचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. सन २०२५-२६ मधील जिल्हा स्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ आशा स्वयंसेविका व १ गट प्रर्वतकाचा सत्कार करुन त्यांना साहित्य व चष्मे वाटप करण्यात आले.

आदिशक्ती साहित्य व चष्मे वाटप

आदिशक्ती योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २ आदिशक्ती सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘टॅब’चे, २ आदिशक्ती सेविकांना ई-सायकलच्या चावीच्या प्रतिकृतीचे वितरण करण्यात आले. आशा व अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात चष्मे वाटप करण्यात आले.

कल्याणकारी योजनांची मंजुरीपत्रे व प्रमाणपत्रांचे वितरण

यावेळी अनाथ प्रमाणपत्र, घरकुल योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या एकल महिलांना घराच्या प्रतिकृतीचे, घरकूल मंजूरपत्राचे तसेच एकल महिला बचत गट कर्ज मंजूरी पत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात हस्तांतरण करण्यात आले.

0000

 



Source link

- Advertisement -