उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून 16 कोटींचा निधी – प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून 16 कोटींचा निधी – प्रवीणसिंह परदेशी
- Advertisement -


सोलापूर, दि. ९ (जिमाका ) : उजनी धरणातील जैवविविधता संवर्धन तसेच परिसरातील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी ‘मित्रा’ संस्थेकडून 16 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उजनी धरणातील विविध प्रश्नांवरील आढावा बैठकीत श्री. परदेशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, वनविभागाचे रेंज ऑफिसर रोहित कुमार गारगडे, बीएचएनएस ट्रस्टचे डॉक्टर उन्मेश काटवटे, मत्स्य व्यवसायिक भरत मालव तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. परदेशी पुढे म्हणाले की, उजनी धरणात आफ्रिकन कॅट फिश माशामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मंगुर, सकर माउत यासारख्या कॅट फिश मुळे उजनी धरणातील जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. कॅट फिश खाण्यास हानिकारक आहेत, तसेच त्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो त्यामुळे अशा आफ्रिकन कॅट फिश माशांच्या बीज उत्पादन करण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच मत्स्य व्यवसाय विभागाने स्थानिक माशांच्या बीज उत्पादनास प्रोत्साहन देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच उजनी धरण क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.  उजनी धरणातील जैवविविधता टिकवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उचित कार्यवाही करण्यात येईल. तर 16 कोटींच्या निधीतून’ स्थानिक माशांच्या संवर्धन व प्रजनन केंद्रांसह मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित प्रकल्प राबवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

यावेळी बी एन एच एस ट्रस्टचे डॉक्टर उन्मेश काटवटे यांनी या संस्थेमार्फत उजनी धरण येथील जैवविविधता तसेच आफ्रिकन कॅट फिश व स्थानिक माशाबाबतच्या केलेल्या अभ्यासात आलेली आकडेवारी बैठकीत सादर केली. ट्रस्टच्या वतीने मासेमारी करणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत असून आफ्रिकन कॅट फिश उत्पादन व पैदास करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. स्थानिक माशाच्या बीज उत्पादनास प्रोत्साहन दिले जात आहे. मागील 30 ते 40 वर्षाचा अभ्यास केला असता उजनी धरणातील स्थानिक 30 ते 35 माशांच्या प्रजाती कायमच्या नष्ट झालेले आहेत तर 40 प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उजनी धरण परिसरात मासेमारी करणारे श्री भरत मालाव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व सकरमाऊथ माशामुळे स्थानिक माशावर मोठा प्रघात झाला असून हे मासे मासेमारीच्या जाळ्याही फाडतात तसेच स्थानिक माशांनाही खातात असे त्यांनी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  1. 16 कोटींचा निधी

उजनी धरण परिसरातील जैवविविधता जतन व मच्छीमारांच्या उपजीविकेसाठी निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

  1. फिश मील व फिश ऑईल उद्योगासाठी चाचपणी

उजनी पाणलोट क्षेत्रात फिश मील आणि फिश ऑईल उद्योग आणता येईल का, याचा अभ्यास/चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  1. आक्रमक वनस्पतींचे उच्चाटन

आयपोमिया (Ipomoea) व वेळी बाभूळ/Prosopis juliflora यांसारख्या आक्रमक वनस्पती परिसरातून काढण्यासाठी खांडेकर यांनी स्वखर्चाने तात्काळ कारवाई करावी, असा इशारा देण्यात आला. अन्यथा वाळू व माती उत्खनन तात्काळ थांबवण्याची चेतावणी देण्यात आली.

  1. अवैध आफ्रिकन मांगूर पैदाशीवर कारवाई

बेकायदा आफ्रिकन मांगूर (African catfish) पैदाशी संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची मदत उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत स्पष्टता झाली.

  1. मत्स्य विभागाला छाप्याचे आदेश

मत्स्य व्यवसाय विभागाने मांगूर माशांच्या पैदास केंद्रांवर तात्काळ छापे टाकावेत आणि स्थानिक माशांच्या साठ्यात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

  1. सामंजस्य करार (MoU)

आक्रमक माशांच्या प्रजातींचे व्यवस्थापन आणि स्थानिक प्रजातींच्या संवर्धन-प्रजनन कार्यक्रमासाठी मत्स्य व्यवसाय विभाग व महाराष्ट्र शासन यांच्याशी सोमवार, दि. १४ जुलै २०२६ पर्यंत MoU करण्याचे ठरले. हा करार पाटबंधारे विभागाच्या धर्तीवर करण्यात येईल. यासाठी सह आयुक्त (मत्स्य व्यवसाय) आयएएस प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

7. उप आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक

मत्स्य व्यवसाय उप आयुक्त, सोलापूर यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्याचेही ठरवण्यात आले.

  1. सामाजिक वनीकरणातून लागवड

सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) यांनी उजनी परिसरात स्थानिक जलचर वनस्पतींची लागवड करण्यासाठी मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

धरणाच्या परिसंस्थेला धोका—तातडीच्या उपाययोजना

उजनी धरणातील वाढते प्रदूषण, आफ्रिकन कॅटफिशचा धोका आणि आक्रमक वनस्पतींमुळे परिसंस्थेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.

000

 

 



Source link

- Advertisement -