संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा 

 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा 
- Advertisement -


सातारा, दि. ११ – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून १५ ते १९ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी आणि सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाडेगाव येथील दत्त घाट व लोणंद येथील पालखीतळाला भेट देऊन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाण्याचे टँकर्स वाढवण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले , ज्या ठिकाणांहून टँकरमध्ये पाणी भरले जाणार आहे, त्या स्त्रोतांची तपासणी करावी. वारकऱ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आरोग्य विभागाने जास्तीत जास्त फिरती पथके तैनात ठेवावीत. वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे यासाठी पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. गरज भासल्यास शेजारील जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बळ मागवून घ्यावे.

प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात यावेत. संपूर्ण पालखी सोहळ्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी. सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या टँकरची तसेच शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखाशी संपर्क साधण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातील. तसेच सोहळ्यात सुसज्ज रुग्णवाहिकाही तैनात राहणार आहेत. पालखी सोहळा भक्तिमय व सुरक्षित वातावरणात मार्गस्थ करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून यासाठी बैठक घेऊन निर्देश देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.

0000000



Source link

- Advertisement -