मुंबई, दि .१५: अनुसूचित जाती प्रवर्गातील हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार, उद्योग तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या लाभासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महामंडळाच्या ५० टक्के अनुदान योजनेत एकूण प्रकल्प खर्च ५०,०००/- असून त्यापैकी २५,०००/- अनुदान आणि २५,०००/- बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेद्वारे लघु व्यवसाय, सूक्ष्म उद्योग तसेच उपजीविकेस पूरक उपक्रमांना चालना दिली जाते.
बीज भांडवल योजनेत ५०,००१/- ते ५,००,०००/- पर्यंतच्या प्रकल्पांसाठी महामंडळाचा २० टक्के सहभाग असून त्यामध्ये जास्तीत जास्त ५०,०००/- अनुदान व बीज भांडवल ५०,०००/- दिले जाते. बँकेचा ७५ टक्के (३,७५,०००/-) सहभाग असून कर्ज बँकेच्या विद्यमान व्याजदराने उपलब्ध होते. लाभार्थ्याचा ५ टक्के (२५,०००/-) सहभाग असून कर्ज परतफेडीचा कालावधी ३ ते ५ वर्षे आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारण्यास मदत होते.
थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १,००,०००/- पर्यंत कर्ज वार्षिक ४ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत प्रकल्प खर्च १००,०००/-, महामंडळाचा ५० टक्के सहभाग (अनुदान जास्तीत जास्त ५०,०००/-), थेट कर्ज ४५ टक्के (४५,०००/-) आणि लाभार्थी सहभाग ५ टक्के (५,०००/-) आहे. ही योजना जलद व सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना अल्पावधीत व्यवसाय सुरू करता येतो.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसएफडीसी), नवी दिल्ली यांच्या माध्यमातूनही विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये १,४०,०००/- ते ५,००,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. एकूण प्रकल्पाच्या ९० टक्के निधीची तरतूद एनएसएफडीसीमार्फत केली जाते. तसेच जास्तीत जास्त ५०,०००/- पर्यंत अनुदान देण्यात येते, तर उर्वरित रक्कम बीज भांडवल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. या योजनेत अर्जदाराचा कोणत्याही स्वरूपात आर्थिक सहभाग नाही.
(एनएसएफडीसी) शैक्षणिक कर्ज योजनेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी महामंडळाच्या नियम, अटी व शर्तींनुसार १०,००,०००/- ते ४०,००,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
तसेच (एनएसएफडीसी) मुदत कर्ज योजना व सूक्ष्म पुरवठा कर्ज योजनेत १,४०,०००/- ते ३,००,०००/- पर्यंत कर्जाची तरतूद असून ती महामंडळाच्या नियम, अटी व शर्तींनुसार दिली जाते.
अर्ज करण्यास आवश्यक पात्रता :
१. अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
२. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी रु ३.०० लाख एवढी आहे.
३. अर्जदार हा या महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे :
१. जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेल्या दाखला.
२. पासपोर्ट आकाराचे फोटो
३. रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड प्रत.
४. कोटेशन व व्यवसायासाठी असलेल्या आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर दाखले.
५. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल.
६. बँक खाते क्रमांक पासबुकची झेरॉक्स प्रत.
वरील सर्व योजनांची सविस्तर माहिती. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर उपलब्ध आहेत. तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती नीट वाचून घेणे आवश्यक आहे. तरी जास्तीत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००
एकनाथ पोवार/स.सं




















WhatsApp