जिगाव धरण प्रकल्पाची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी; उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना

जिगाव धरण प्रकल्पाची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी; उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना
- Advertisement -


बुलढाणा, दि. १७: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाची उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा, प्रवीण चावरे, गणेश हासे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, धरणाची जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, धरण क्षेत्रातील भूसंपादन, पुनवर्सन, कालव्यांच्या उभारणीची प्रगती आणि प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती सादर केली. प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर यावेळी चर्चा झाली.

धरण परिसराची पाहणी करताना सहपालकमंत्री सावकारे यांनी प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक बाबींची माहिती घेतली. धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची कामे आणि पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोलताना सहपालकमंत्री सावकारे म्हणाले की, जिगाव धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल. प्रकल्पाची सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

००००



Source link

- Advertisement -