पुणे दि. १८: क्वांटम कॉम्पुटिंग आणि डीप टेक टेक्नॉलॉजीने आज संपूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. या तंत्रज्ञानाने केलेल्या अफाट वाढीशी, त्याच्या वेगाशी त्वरेने जुळवून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी परिपूर्ण अशी इकोसिस्टिम (परिसंस्था) निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या इंटर ॲक्शन वुईथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉरमेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब ॲण्ड फ्रंटीयर टेक इन्स्टिट्यूट कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या इंटर ॲक्शन वुईथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉरमेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब ॲण्ड फ्रंटीयर टेक इन्स्टिट्यूट या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, महाराष्ट्र राज्य ‘मित्रा’ चे दीपक करंजीकर, ॲलिकॉन कॅस्टलॉयचे हर्ष गुणे, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर, ॲक्टीन टेक्नॉलॉजीचे विकास महाजन, बिग्रेडीयर सचिन कालिया, स्टॅटरजिक रिसर्च ॲण्ड ग्रोथ फाऊंडेशनचे वरुण खंदारे, सिम्बॉयसिसच्या प्र. कुलगुरु डॉ. स्वाती मुजूमदार, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडिस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबणे, इंडियन इस्टिटयूट ऑफ सायन्स ॲण्ड रिसर्चचे प्रसन्नजित फडणवीस, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, टाटा स्टिल लि. चे माजी उपाध्यक्ष सी. आर. कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,या तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावरील वाटा २०२४ मध्ये जवळपास २ ते ३ ट्रिलियन डॉलर्स होता, जो पुढील पाच वर्षांत सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. मानवी इतिहासात आपण यापूर्वी कधीही अशी गती आणि वाढ पाहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला या विकासाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग व्हावेच लागेल.
मुख्यमंत्री म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्सकडे (Frontier Technology Index) पाहताना भारत यामध्ये चांगली कामगिरी करतना दिसत आहे. आपण सध्या ३६ व्या क्रमांकावर असलो, तरी आपली गणना अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणारे म्हणून केली जात आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपण या क्षेत्रात उत्तम काम करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सध्या विखुरलेले आणि वैयक्तिक पातळीवर अधिक केंद्रित असले, तरी आपण या प्रयत्नांचे संस्थात्मकीकरण केले, तर संपूर्ण चित्र बदलू शकते.
आज सिलिकॉन, एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वाँटम कॉम्पुटिंग जग बदलून टाकणाऱ्या आहेत असे सांगून ते म्हणाले, आपल्या व्यवसायाचा प्रत्येक भाग या तीन गोष्टींमुळे सकारात्मक, नकारात्मक किंवा क्रांतिकारी पद्धतीने प्रभावित होणार आहे. त्यासाठी मजबूत इकोसिस्टीम (परिसंस्था) तयार करावी लागेल अन्यथा आपण काळाच्या ओघात मागे पडू. विशेषतः उत्पादन क्षेत्रात आपली सर्वात मोठी ताकद असणारे आपले एमएसएमई उद्योग निधीची कमतरता आणि क्षमतांसह इतर अनेक गोष्टींच्या अभावामुळे या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकत नाहीत. सर्वांगीण विकासासाठी इकोसिस्टीम तयार करायची असेल, तर सर्वांना सहज उपलब्ध असणारे स्मार्ट सुविधा आणि प्लॅटफॉर्म्स निर्माण करावे लागतील. आणि या स्मार्ट व्यवसायांच्या गरजा पूर्ण करू शकणारे सक्षम मनुष्यबळ तयार करावे लागेल.
महाराष्ट्राला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी, या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर सर्वसमावेशकता आणावी लागेल. त्यासाठी अशा विशिष्ट तंत्रज्ञानाला समर्पित असणारी संस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या क्वाँटम तंत्रज्ञानासंबंधीच्या योजना आधीच सुरू झाल्या असल्याचे सांगून आपण आपल्या प्रयत्नांना केंद्र सरकारच्या या उपक्रमांशी सुसंगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाला या तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या संस्थेची गरज तीव्रतेने जाणवत आहे. ‘मित्रा’ या दिशेने विचार करत आहे आणि काम करत आहे. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि डीप टेकसाठी एक ठोस धोरणात्मक चौकट तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन धोरणांचे संस्थात्मक एकत्रिकरण करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले, अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी नवीन सुविधा आणि प्लॅटफॉर्म्सच्या बाबतीत शासन गुंतवणूक करण्यास पूर्णपणे तयार आहे. मित्रा’ने ठरवल्याप्रमाणे, आपल्याला क्वाँटम कम्प्युटिंगच्या प्रशिक्षकांचा एक मोठा गट तयार करायचा आहे, जे पुढे इतरांना प्रशिक्षित करतील. पुढील दोन तीन वर्षांत क्वाँटम कम्प्युटिंग क्षेत्रात किमान पाच हजार लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या वेगवेगळ्या पातळीवर होत असलेले हे सर्व प्रयत्न एकत्र आणून त्यांचे संस्थात्मकीकरण केले जाऊ शकते. त्या दृष्टीने इंटरॅक्शन विथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉर्मेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटीयर टेक इन्स्टिट्यूट हा खरोखरच एक उत्तम उपक्रम आहे. मुंबईमध्ये विकसित होत असलेल्या ‘इनोव्हेशन सिटी’ साठी शासनाने टाटा समूहाशी भागीदारी केली असून ते सध्या या इनोव्हेशन सिटीचा संपूर्ण आराखडा तयार करत आहेत. एफटीआयचा हा उपक्रम इनोव्हेशन सिटीच्या संकल्पनेशी तंतोतंत जुळणारा आहे, त्यामुळे आपण यामध्येही एकत्र काम करू शकतो, असेही त्यांनी या विषयासाठी विविध क्षेत्रातील जमलेल्या तज्ञांशी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी विविध क्षेत्रांमध्ये क्वाँटम तंत्रज्ञानाचा असलेला स्कोप याबद्दल चर्चा केली. हर्षवर्धन गुणे यांनी प्रास्ताविक केले, विकास महाजन यांनी आभार मानले.
०००




















WhatsApp