नाशिक, दि. 19 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर म्हणून विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसराला आदर्श ग्रीन कॅम्पस म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विद्यापीठ परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र, मौजे शिवनई, ता.दिंडोरी येथे आज आयोजित ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गिते, ,विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, बागेश्री मांडाळकर, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी स्थायी समिती सदस्य गणेश गिते, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह प्राध्यापक, नाशिक मधील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, या अभियानाअंतर्गत विद्यापीठ परिसरात ६२ एकर परिसरात सुमारे दिड हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते, यावर्षी लावलेली झाडे टिकविण्यासाठी वृक्षसंवर्धनावर अधिक भर देण्यात आला आहे. ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत ८ ते १० फूट उंचीची वृक्षरोपे आणून नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची लागवड करण्यात आली. प्रत्येक वृक्षासाठी संरक्षक व्यवस्था, नियमित पाणी, देखभाल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला असून, ही झाडे शंभर टक्के सुरक्षित रहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून ती वाढविणे आणि त्यांचे संगोपन करणे हीच पर्यावरण संवर्धनाची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिक शहर अधिक हरित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून ते यशस्वी करण्याचा मानस आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आपले विशेष नाते असल्याचे सांगताना मंत्री महाजन म्हणाले की, आपण या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलो असून, विद्यार्थी जीवनात कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉलसह विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होण्याची संधी मिळाली. विद्यापीठातील शिक्षण, संस्कार आणि वातावरणाने आयुष्याला दिशा दिली. त्यामुळे हा परिसर अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बनविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होतो. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने या वृक्षारोपण मोहिमेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. जलसंवर्धनासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पाणी थांबविणे, बंधाऱ्यांमधील गळती रोखणे, जलसाठ्यांचे संरक्षण करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन बंधारे आणि धरणांची उभारणी करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडून विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. एनएमआरडीएने मंजूर केलेल्या १८ मीटर रुंद रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
‘उन्नत नाशिक’ साकार करण्यासाठी सुदृढ आणि सक्षम युवा पिढी आवश्यक असल्याचे सांगत मंत्री महाजन यांनी तरुणांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. निरोगी जीवनशैली स्वीकारून सक्षम, सशक्त आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश मंत्री महाजन यांनी दिला.
मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते दऱ्याई माता देवस्थान परिसरात झाले वृक्षारोपण

नाशिक महानगरपालिकेच्या ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत शहर व परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन ग्रीन नाशिक’ उपक्रमाअंतर्गत दऱ्याई माता देवस्थान परिसरात राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार,
कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार, विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षदिंडीस प्रारंभ करण्यात आला. या वृक्षदिंडीत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे जलद प्रतिसाद पथक, जनार्दन स्वामी वारकरी शिक्षण संस्था (त्र्यंबकेश्वर), श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था (त्र्यंबकेश्वर) तसेच सूर्या अकॅडमीचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, नाशिक शहरात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी दर रविवारी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ उभारण्यात येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या नाशिक शहराची ओळख सर्वात हिरवेगार शहर म्हणून झाली पाहिजे यादृष्टीने सर्वकष प्रयत्न करूया अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
००००






















WhatsApp