‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार

‘माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार
- Advertisement -


  • ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा सुरेल संगम
  • विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन

मुंबई, दि. २० : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘माऊली’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्यावर आधारित संगीतमय नाट्यप्रवास हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण असणार असून, यावेळी विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक ज्ञान, अध्यात्म आणि भक्तीच्या माध्यमातून समाजाला समता, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ आणि ‘पसायदान’ या त्यांच्या अजरामर साहित्यकृती आजही समाजाला दिशा देणाऱ्या ठरत आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा त्यांचा सार्वकालिक संदेश मानवकल्याणाची प्रेरणा देणारा आहे.

‘माऊली’ या संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे अध्यात्म, भक्तीमार्ग, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश संगीत, अभिनय, नृत्य आणि प्रभावी रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून संत परंपरेचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘माऊली’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, अध्यात्माचा आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा आणि त्यांच्या अमर संदेशाचा गौरव करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरणार आहे.

हा उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे, सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या कालातीत संदेशाचा संगीतमय अनुभव घेण्याची ही एक आगळीवेगळी संधी आहे. कला रसिक, वारकरी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 



Source link

- Advertisement -