नागपूर, दि. २६ : जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.

विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हथीबेड, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, माजी खासदार अजय संचेती, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य कितपत आत्मसात करता येते आणि रोजगाराच्या दृष्टीने त्याचा कितपत उपयोग होतो, याचा पूर्वी विचार झाला नव्हता. २०१४ पासून खऱ्या अर्थाने कौशल्य विकास या विषयाला महत्त्व देण्याचे धोरण राबविण्यात आले. आज उद्योग आणि व्यवसायात रोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व आले आहे. एकीकडे युवकांपुढे रोजगाराची समस्या असताना दुसरीकडे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याची अडचण होती. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना त्यांचा लाभ स्थानिक युवकांना घेता यावा, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची कल्पना पुढे आली असल्याचे ते म्हणाले.

विदर्भात मोठ्या प्रमाणात सोलर, इलेक्ट्रीक वाहन, आरोग्य तसेच लोहखनिज प्रकल्पांची इकोसिस्टीम आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या विचारातूनच कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठाच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार व आधुनिक गरजांना साजेसे असे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांना सध्या जे कौशल्य प्रशिक्षण दिले जातेय, त्यातून ७५ टक्के युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत.
विदर्भातील युवकांना मोठा लाभ होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कौशल्य विकास केंद्र आणि प्रस्तावित असलेल्या कौशल्य विकास विद्यापीठामुळे रोजगारक्षम बनण्याच्या दृष्टीने विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल आणि उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोहखनिज उद्योगांत गुंतवणूक येत आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील उद्योग नागपूर व विदर्भात येत असून या उद्योगांना स्थानिक पातळीवरच कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विदर्भातील मुलांना या सुविधांचा निश्चितच मोठा लाभ होणार आहे, असा विश्वासही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला. कार्यक्रमात एआयडीच्यावतीने चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यात एकात्मिक पोलाद उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठीचे एक स्वारस्यपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याशिवाय असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रॉडक्शन यांच्यात यावेळी एक सामंजस्य करार झाला. स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन इटनकर, असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, टाटा स्ट्राईव्हचे अमेय वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
असे आहे केंद्र

या आधुनिक स्किल सेंटरमध्ये दरवर्षी सुमारे २ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, प्लेसमेंट सहाय्य आणि उद्योजकता विकास या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. केंद्रात दहावी आणि बारावी तसेच पदवीधर युवक-युवतींसाठी निःशुल्क विविध अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक अभ्यासक्रमांमध्ये ऑन-द-जॉब प्रशिक्षण, तसेच संगणक आणि इंग्रजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.



०००






















WhatsApp