नागपूर, दि. २९: नैसर्गीक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टीकोणातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. हे कार्य पुढे घेवून जाण्यासाठी नवी पंचसुत्री आखण्यात आली आहे. तसेच मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वन विभागाद्वारे येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनीवास राव यांच्यासह कंबोडीया, भुतान आणि बांग्लादेशातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाघ हा नैसर्गीक अधिवास आणि अन्न साखळीचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या संवर्धनातून पर्यावरणाचे व वनांचे संरक्षण होते. म्हणूनच राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोणातून व्याघ्र संवर्धन कार्य सुरू आहे. राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर भागांतून गावांचे स्थलांतरण करण्यात आले व नवीन बफर क्षेत्र तयार करण्यात आले. वनविभागाच्या नवीन धोरणामुळे व्याघ्र प्रकल्पा शेजारील गावकऱ्यांनी पुनर्वसन व स्थलांतरासाठी पुढाकार घेतला आहे. मानव वन्यजीव संघर्ष दुर करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पालगत गावांमध्ये नियोजनबद्ध कार्यपद्धती आखण्यात आली आहे. व्याघ्र हालचालीसाठी कॅमेरा ट्रॅकींग, एआय आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम आदी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामुळे वाघ, जैवविविधता आणि पर्यटन यांच्या संवर्धनासाठी नवी परिसंस्था उभी राहिली आहे. परिणामी 2014 मध्ये राज्यात असलेली वाघांची 190 ही संख्या वाढून 444 झाली आहे व नवीन वाघ गणनेत ही संख्या 600 च्या वर गेल्याचे चित्र दिसेल, असे त्यांनी सांगितले.
जगातील व्याघ्र संख्येच्या 75 टक्के वाघ भारतात आहे आणि भारतातील वाघांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या दोन दशकांपासून व्याघ्र संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्वाच्या पाऊलांमुळे देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानाकडे मार्गक्रमण करित आहे. वाघांच्या अस्तित्वाचे महत्व समजून घेत त्याचा मानवाच्या चरितार्थ व अस्तित्वासोबत समन्वय करून मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, व्याघ्र अधिवास हरित उपजिविका अभियान राबविणे, व्याघ्र संवर्धनासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर धोरण आखणे, शाश्वत पर्यटन धोरण तयार करून रोजगार निर्मिती करणे आणि पर्यटन वाढवतांना वनसंरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे अशी व्याघ्र संवर्धनासाठी पंचसुत्री आखण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात वृक्ष वाढविण्यासाठी 5 टिश्यु कल्चर प्रयोगशाळा – वनमंत्री गणेश नाईक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचा चेहरामोहरा बदलत आहे. या विभागाच्या विकासासाठी सर्वसहकार्य मिळत आहे. म्हणूनच व्याघ्र संवर्धनासोबतच नवनवीन संकल्पनांच्या अंमलबजावणीतून वनविभागाचे कार्य पुढे जात आहे. राज्यात 300 कोटी वृक्षारोपणाचा ध्यास विभागाने घेतला असून जास्तीत जास्त रोप तयार करण्यासाठी राज्यात 5 ठिकाणी टिश्यु कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे, वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वनविभागाद्वारे आयोजित याविशेष परिषदेच्या माध्यमातून राज्यातील व्याघ्र प्रकल्पांतून पर्यटनाला चालना व रोजगार निर्मिती होईल आणि येत्या काळात अशा आयोजनांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल असा, विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाचे सामंजस्य करार
वनविभागाच्या पुढील वाटचालीसाठी व व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. या आयआरसीटीसी आणि वनविभागादरम्यान शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. बायएफ आणि वनविभाग यांच्या एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन सीएसआर उपक्रमाद्वारे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात समृद्धी प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. आरोहा ग्रुप, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्यात शाश्वत पर्यटनावर आधारित पंचतारांकित लक्झरी प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार असे एकूण 11 सामंजस्य करार करण्यात आले.
‘समुदाय आधारित जीवनोपयोगी उपक्रम आणि हरित अर्थव्यवस्था’, ‘व्याघ्र संवर्धनासाठी सीएसआर गुंतवणूक’, ‘महाराष्ट्र-भारताचे प्रमुख वाघ (टायगर) पर्यटन गंतव्यस्थान’ आणि ‘मनुष्य-वाघ सहअस्तित्व आणि परिसंस्थेचे संवर्धन’ विषयांवर विषयतज्ज्ञांचे सादरीकरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय कार्यासाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी, प्रधान वनसंरक्षक एम एस रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी नागपूर ग्रोथच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांबाबत माहिती दिली. नागपूर विभागाचे वनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी आभार मानले.
0000






















WhatsApp