शहरातील नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश आबिटकर

शहरातील नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश आबिटकर
- Advertisement -


मुंबई, दि. ३० : राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आयुक्तालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय आणि धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ‘शहरी आयुक्तालयाच्या प्रशासकीय संरचना’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, अतिरिक्त अभियान संचालक जगन्नाथ वीरकर, सहसंचालक दीप्ती देशमुख-पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या शहरी लोकसंख्येच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेचा व्यापक आराखडा तयार केला आहे. प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा वेळेत मिळावी, यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. शहरस्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उणिवा दूर कराव्यात आणि प्रत्येक स्तरावर समाधानाभिमुख (Solution Oriented) कार्यपद्धती स्वीकारावी.

राज्यात सध्या २९ महानगरपालिका आणि ३९९ नगरपरिषदा, नगरपंचायती व कटकमंडळे अशा एकूण ४२८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सेवा विस्ताराचे काम सुरू आहे. या क्षेत्रांमध्ये २,९३२ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व ‘आपला दवाखाना’, ८१८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४४ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे तसेच इतर १०५ आरोग्य संस्था कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत नागरी आरोग्य संस्थांच्या कार्यान्वयनात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १,०४१ वरून २,००६ पर्यंत वाढली असून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांची संख्या ४३२ वरून ६७४ पर्यंत पोहोचली आहे. एकूण कार्यान्वित नागरी आरोग्य संस्थांची संख्या २,५३८ वरून ३,७६७ इतकी झाली आहे.

मंत्री श्री. आबिटकर यांनी नागरी आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाचे नियमित मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले. कार्यक्षम आणि सक्षम व्यक्तींची नियुक्ती करून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळेल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास त्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक आरोग्य संस्थेच्या कार्यक्षमतेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून सेवा वितरणात कोणतीही उणीव राहणार नाही, यासाठी सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा आढावा घेत मंत्री श्री. आबिटकर यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, सेवा गुणवत्तेतील सातत्यपूर्ण सुधारणा आणि नागरिकांचा वाढता विश्वास कायम राखण्यावर विशेष भर दिला. कार्यकुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमातून अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरी आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता मानकांनुसार पायाभूत सुविधा विकसित करणे, रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरणे, समुदाय सहभाग वाढविणे, जनआरोग्य समित्या आणि महिला आरोग्य समित्यांना सक्रिय करणे, आरोग्यदूत संकल्पना राबविणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आरोग्य सेवांचे प्रभावी नियोजन करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही मंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च ध्येय आहे. शहरी आरोग्य व्यवस्थेच्या सर्वांगीण बळकटीकरणातून प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रभावी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ



Source link

- Advertisement -