मुंबई, दि. ३ : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी 2023, 2024 व 2025 या कालावधीत पीएच.डी करीता अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.
आर्टी मार्फत अनुसूचित जातीतील मातंग, मांग, मिनीमादीग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी, मादिगा या जातीतील संशोधक विद्यार्थ्यांकरिता ‘अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ (एएसएनआरएफ) योजना राबविली जात आहे. कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती करिता 37 हजार तर वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी 42 हजार रुपये प्रतिमाह अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे. त्यानुसार आर्टी, मुंबई संस्थेमार्फत दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पीएच. डी करिता कायम नोंदणी असणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकडून पीएच. डी अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्ज करावे.
या योजनेचा सविस्तर तपशील, कालावधी, निवड पात्रता निकष, मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक इत्यादी बाबतच्या माहितीकरिता आर्टी संस्थेच्या https://www.arti.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी https://fellowship.trti-maha.in या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
शैलजा पाटील/विसंअ






















WhatsApp