यवतमाळ, दि. १५: शासन, प्रशासनासह सर्वांच्या सहभागातूनच विकसित यवतमाळ घडविता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रात राज्यातला एक आदर्श जिल्हा बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले.

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, यवतमाळच्या नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, युवक, महिला, पत्रकार व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले, आजचा दिवस हा देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि विकसित भारत घडविण्यासाठी संकल्प करण्याचा आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य लाभले. आता आपल्यासमोर स्वतंत्र भारताला विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत बनविण्याचे आव्हान आहे.

यवतमाळ जिल्हा हा कष्टकरी शेतकरी, मेहनती कामगार, उद्योजक, युवक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६४ टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात ८ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीच्या सुरुवातीच्या काळात बोगस सोयाबीन बियाणे, रासायनिक खत आणि कीटकनाशकाच्या बाबतीत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
४३ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४ कोटी रुपये वितरित

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांप्रमाणे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्यात यवतमाळ जिल्ह्यातीत ४३ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ दिला जाणार आहे. तसेच २०१९ पूर्वीच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून त्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यातील ८२ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १०२१ कोटी रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई
३० व ३१ जुलै २०२६ रोजी बहुतांश भागात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिक, जमीनीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. याशिवाय घर व दुकानात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची वाढीव भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी व प्रेरणा प्रकल्प
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘मिशन उभारी’ या उपक्रमातून संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे. तसेच प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये शेतकरी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षा मार्फत नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी करून औषधेपचार केले जात आहे. बदलत्या काळात शेतीसोबत कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचनालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
सिंचन प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा ; पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
जिल्ह्यातील एकूण ७३ प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अल-निनोचे सावट राहणार आहे. पुढील कालावधीत जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन या प्रसंगी करतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत यावर्षी आतापर्यंत ५१ प्रस्तावांना अनुदान वितरित करुन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत.
२ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना ५७ कोटींचा पीएम किसान सन्मान निधी
शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना ५७ कोटी ९४ लाख रुपयांचा २३ वा हप्ता देण्यात आला आहे. तसेच पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून केंद्र सरकार सकारात्मक आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध कामे
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिलांसाठी पिंक शौचालय, लहान व्यावसायिकांसाठी रोजगार गाळे उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात मॉड्यूलर किचन, सीटी स्कॅन मशीन, डायलिसिस युनिट, जलशुद्धीकरण यंत्रे उपलब्ध केली आहे. मिशन एक्सलन्समुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असून नवोदय विद्यालय प्रवेशातही वाढ झाली आहे.
१२ लाख ५३ हजार लाभार्थ्यांना आयुष्मान गोल्डन कार्ड
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सुसज्य करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करुन रुग्णांना अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. याबरोबरच, एकत्रित आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत २३९९ आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील ६४ रुग्णालये संलग्न करण्यात आले आहेत. तसेच २४ लाख लाभार्थ्यांपैकी १२ लाख ५३ हजारहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्मान गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वाचनालय बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. सोबतच जिल्ह्यातील शाळा डिजीटल केल्या जात आहेत. लवकरच केंद्रीय विद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधायुक्त इमारत उपलब्ध होणार आहे.
८ हजार ७६७ शेत पाणंद रस्ते
ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान अधिनियम मंजूर केला असून याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासह मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनाअंतर्गत सातही विधानसभा क्षेत्रामध्ये १४ हजारपेक्षा जास्त किलोमीटर लांबीचे एकूण ८ हजार ७६७ शेत पाणंद रस्त्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी एकूण ३६.५० कोटी रुपये निधीची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
महाराजस्व समाधान शिबीरात दाखले, प्रमाणपत्र वितरित
जिल्हा प्रशासनामार्फत ११० मंडळात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात लाभार्थ्यांना ३ लाखांपेक्षा जास्त दाखले, प्रमाणपत्र व ६६ हजार डिजिटल सातबारे वितरित करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी तसेच महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ‘यवतमाळ महोत्सव’ या अभिनव उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’ व ‘युवा संवाद’ उपक्रम
जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही ‘सुपर ५०’ या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ५० निवडक विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षांसाठी दोन वर्षांचे संपूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहोत. तसेच आजच्या पिढीला करिअर घडविण्याच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने आपण ‘युवा संवाद’ उपक्रमाद्वारे त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी व करिअर मार्गदर्शन केले आहे.
३८५ स्मशानभूमीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी शेड व इतर कामाकरिता २८ कोटी ९३ लाखांच्या ३८५ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. स्मशानभूमीसाठी जागा असून शेड नसलेल्या १९९ गावांमध्ये शेड उभारणे प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर करण्यात येणार आहे.
महिला बचत गटांसाठी खाऊगल्ली
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यामातून बचत गटांना आतापर्यंत पंधराशे कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले असून, २२ हजार पेक्षा जास्त महिला विविध व्यवसाय करीत आहेत. ही बाब महिला सक्षमीकरणाची नवी दिशा दाखवणारी ठरत आहे. यासोबतच महिलांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील बचत गटांसाठी खाऊगल्ली देखील उभारण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांवर भर
जिल्ह्याच्या क्रीडा विकासात आणि वैभवात भर पडेल असे क्रीडा संकुल आणि ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान, रायफल शुटींग रेंज उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील सिंथेटीक हँडबॉल मैदान अद्ययावत करुन खेळाडुंसाठी उपलब्ध झाले आहे. दारव्हा येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारल्याने खेळाडुंना दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. चला खेळूया उपक्रमाअंतर्गत खेळाडूंना शिबीराद्वारे प्रशिक्षण, आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उद्योग व रोजगाराला चालना
जिल्ह्यात खादी व ग्रामोद्योगमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०० उद्योगांना बँकेने कर्ज मंजुरी दिली असून त्याद्वारे ३७० जणांना रोजगार मिळाला आहे.
पोलीस दलाचे बळकटीकरण
जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. वडगाव जंगल पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचा विस्तार, ऑफिसर कल्ब व तेथील विद्युतीकरणाची कामे होत आहेत. यासह दारव्हा शहराच्या वैभवात भर पाडणारी पोलीस स्टेशनची इमारत लोकार्पित केली आहे.
२४ वारसांना कायमस्वरुपी शासकीय नोकरी
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसह वसतिगृह प्रवेश, स्वाधार योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत मृत व्यक्तीच्या २४ वारसांना कायमस्वरुपी शासकीय नोकरीत सामावून घेतले आहे.
आदिवासींच्या विकासासाठी योजना
आदिवासी बांधवांच्या विकासासाठी धरती आबा, प्रधानमंत्री जनमन योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. विशेषत: आदिवासी कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय मी घेतले असून त्या दिशेने काम सुरू आहे.
टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू
जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात 20 तर पैनगंगा अभयारण्यात २ वाघांची नोंद झाली असून ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे वनपर्यटनाला पर्यटकांची पसंती वाढतांना दिसत आहे.
शक्तीपीठ व रेल्वे मार्गाला गती
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग’ आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण केली जात आहे.
जलसंधारणाची कामे प्रगतीपथावर
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत जिल्ह्यात १३ हजारपेक्षा जास्त कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 10 हजार पेक्षा जास्त कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी आतापर्यंत १२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १९९ गावांत ९३० कि.मी. खोलीकरण प्रस्तावीत असून, ७०७ कि.मी. खोलीकरण पुर्ण करण्यात आले आहे व २६९ कोल्हापूरी बंधारे व कॉजवे प्रस्तावीत असून १३१ कामे पुर्ण झाली आहेत व १३८ कामे प्रगतीपथावर आहेत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत १६५ कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर २२३ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
आजपासून जलसंधारण अभियानाला सुरुवात
जलसंधारणाचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात आजपासून ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तर २६ जानेवारी, २०२७ पर्यंत जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच 21 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन हा “जलसंधारण दिन”म्हणून साजरा केला जाणार असून त्यानिमित्त जलसंवर्धनासाठी जिल्ह्यात “महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जलसंवर्धनासाठी रिल्स स्पर्धा

या उपक्रमात १५ ते ३० वायोगटातील युवकांसाठी सोशल मिडीयावर रिल्स फॉर सॉइल ॲण्ड वॉटर कन्झरवेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे. जिल्यिातील युवकांनी या उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला, युवक आणि नागरिक या सर्वांच्या सहभागातूनच विकसित यवतमाळ घडविता येणार आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी यवतमाळ जिल्ह्याला कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, रोजगार, जलसंधारण, आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात राज्यातला एक आदर्श जिल्हा बनविण्याचा संकल्प करूया. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी शासन पूर्ण ताकदीने आणि प्रत्येक पाउलावर आपल्या पाठीशी आहे. नागरिकांनीही आता जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला व या अभियानाच्या फलश्रुती दर्शक कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. यासोबतच, जलसंधारण अभियान लोगोचे अनावरण आणि मृद व जलसंधारण शपथ घेण्यात आली. याप्रसंगी विविध विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा शोध व बचाव पथकासाठीच्या आपत्कालीन सेवा वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्र्यांकडून नंददीप फाउंडेशनला रुग्णसेवा वाहन भेट

पालकमंत्री यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बेघर, भटक्या मानसिक रुग्णांसाठी अमुल्य सामाजिक कार्य करणाऱ्या नंददिप फाउंडेशनला रुग्णसेवा वाहन भेट देण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

०००









WhatsApp