शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

- Advertisement -


ठाणे,दि. १८ (जिमाका) :- राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित “आरोग्य संस्थांचे लोकार्पण व विविध समिती सदस्यांशी आरोग्य संवाद” या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंद यांच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्साहात संपन्न झाले.

या राज्यस्तरीय कार्यक्रमास मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य आयुक्त श्री. संजय काटकर, आयुक्त शहरी आरोग्य डॉ. भोकरे तसेच संचालक डॉ. नितीन कंदेवाड हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. वासिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास शहापूरचे आमदार मा. श्री. दौलत दरोडा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, जन आरोग्य समितीचे सदस्य, अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच श्री. राजेंद्र मस्कर, उपसरपंच सौ. विशाखा शेलार, जन आरोग्य समितीच्या सदस्या श्रीमती शेटे,अंबरचे सरपंच सुरेखा जाधव, आवळे सरपंच श्री चिंतामण निखडा,अंबाजी ग्रामपंचायतीच्या आरोग्य समितीचे सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. संजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली शेंडगे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी-कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होते.

 

नूतन इमारतीमुळे वासिंद परिसरातील आरोग्यसेवेला मिळणार अधिक बळ

लोकार्पणानंतर आपल्या मनोगतात मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा त्यांच्या जवळच उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या कटिबद्धतेवर भर दिला. आधुनिक आणि सक्षम आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेळेत व प्रभावी उपचार मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वासिंद येथील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा ठरणार असून, या माध्यमातून मातृ व बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, प्राथमिक उपचार, विविध आरोग्य तपासण्या आणि शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचा समिती सदस्यांशी संवाद

लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी कार्यक्रमास उपस्थित आमदार, जन आरोग्य समितीचे सदस्य तसेच गाव आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ग्रामीण स्तरावर आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग वाढविणे, स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक गरजा प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लोकसहभागातून सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प

“स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा नवा अध्याय” या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमामुळे शासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्तरीय आरोग्य समित्या यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली. वासिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत ही केवळ आरोग्य सुविधेची वास्तू नसून शहापूर तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या संकल्पनेचे प्रतीक ठरणार आहे. “गावापासून जिल्ह्यापर्यंत, प्रत्येक नागरिकासाठी सक्षम आणि कणखर आरोग्य सेवा” या उद्दिष्टाच्या दिशेने वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे हे लोकार्पण निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

0000



Source link

- Advertisement -