Home ताज्या बातम्या गिलमन्स पॉईन्टवर पेडगावच्या बापलेकांनी फडकविला तिरंगा!

गिलमन्स पॉईन्टवर पेडगावच्या बापलेकांनी फडकविला तिरंगा!

0

रिसोड : महाराष्ट्रातील अ‍ॅडव्हेंचर कंपनीमार्फत आफ्रिकेतील टांझानिया शहरात जाऊन वाशिम जिल्ह्यातील पेडगाव (ता.रिसोड) येथील शिवलाल मंत्री व त्यांचा १२ वर्षीय मुलगा आरव मंत्री यांनी किलीमांजारो या समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट उंचीवर असलेल्या शिखरावरील गिलमन्स पॉईन्टवर भारताचा झेंडा फडकविला. यायोगे या बापलेकांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा बहुमान देखील पटकाविला.
मूळचे पेडगाव येथील रहिवासी तथा कामानिमित्ति नाशिक येथे स्थानिक झालेल्या शिवलाल मंत्री यांनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिखरावर चढण्याची तयारी केली. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी शिवलाल व आरव यांनी शिखर चढायला सुरूवात केली. शून्याच्या खाली तापमान, सुसाट वेगाने वाहणारे वारे, उभी चढण अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करित या बापलेकांनी ७ नोव्हेंबर रोजी किलीमांजारो शिखरावरील गिलमन्स पॉईन्टवर पाऊल ठेवून त्याठिकाणी भारताचा झेंडा फडकविला.

सर्वोच्च शिखर सर करण्याचे आरवचे ध्येय
आरव या अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकल्याने किलीमांजारो शिखरावरील गिलीमन्स पॉईन्टपर्यंत यशस्वी चढाई केली. यानंतर युरोप व आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. भारताचा तिरंगा शिखरावर फडकवताना अभिमान वाटला, असे त्याने सांगितले.