श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘मुरलीचे सूर’ कार्यक्रमातून कृष्णगीतांची सुरेल मैफल

- Advertisement -


मुंबई, दि. ३ : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कृष्णगीतांवर आधारित ‘मुरलीचे सूर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

श्रीकृष्णाच्या जीवनाशी तसेच त्यांच्या बासरीच्या सुरांशी जोडलेल्या कृष्णगीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमात नचिकेत देसाई, स्वरा जोशी आणि केतकी भावे-जोशी यांचे सादरीकरण होणार असून, अनघा मोडक निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत.

कार्यक्रमाच्या वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी अमेय ठाकूरदेसाई यांच्याकडे आहे. वाद्यवृंदात तबला – अमेय ठाकूरदेसाई, ढोलकी/तालवाद्य – हनुमंत रावडे, ऑक्टोपॅड – दत्ता तावडे, की-बोर्ड – ओंकार देवसकर व दर्शना जोग, संवादिनी – अमित पाध्ये आणि बासरी – विजय तांबे यांचा सहभाग आहे. ध्वनी संयोजन – विराज भोसले आणि प्रकाशयोजना – विलास हुमणे यांची आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भारतीय भक्तिसंगीतातील कृष्णगीतांची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविणे, संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे आणि रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची अनुभूती देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतील भक्तिसंगीत, कृष्णगीतांची परंपरा आणि संगीतकलेचा वारसा जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ पासून यशवंत नाट्य मंदिर येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘मुरलीचे सूर’ या कृष्णगीतांच्या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 



Source link

- Advertisement -