धुळे, दि. ५ (जिमाका): मनमा-इंदूर नवीन ब्रॉडगेज आणि धुळे (बोरविहीर)-नरडाणा रेल्वेमार्ग हे धुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. या रेल्वेमार्गांमुळे धुळे महाराष्ट्रासह मध्य भारत आणि देशाच्या विविध भागांशी अधिक सक्षमपणे जोडले जाणार असून शेतमालाला मोठ्या बाजारपेठा, उद्योगांना गतिमान वाहतूक, युवकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार आहे. विकासाची ही वाट पुढे नेताना जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे हित संवेदनशीलतेने जपत भूसंपादनासह सर्व प्रलंबित बाबी कालबद्ध पद्धतीने मार्गी लावून कामांना गती द्यावी, असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम), किशोर सिंह, वरिष्ठ विभाग अभियंता, समीर कुमार, पीएमएसचे टीम लीडर कौशलेंद्र कुमार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भूसंपादन, संयुक्त मोजणी, शासकीय व वनजमीन, रेल्वेस्थानके, पूल, बांधकामाची प्रगती आणि अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. रेल्वे, महसूल, वन व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून प्रत्येक प्रलंबित बाबीची जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करून एका विभागाच्या कार्यवाहीअभावी पुढील काम थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर (महू) या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची लांबी 309.43 किलोमीटर असून अंदाजित खर्च ₹16 हजार 320.53 कोटी आहे. महाराष्ट्रात 16 आणि मध्य प्रदेशात 18 अशी एकूण 34 रेल्वेस्थानके प्रस्तावित आहेत. हा केवळ रेल्वेमार्ग नसून धुळे जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी नवे क्षितिज खुले करणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
धुळ्याच्या कनेक्टिव्हिटीला नवे परिमाण
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गामुळे धुळे मनमाडमार्गे देशाच्या विस्तृत रेल्वे जाळ्याशी, तर नरडाणा-शिरपूरमार्गे डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदूर आणि मध्य भारताशी जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीला वेग मिळून देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. धुळे व नरडाणा परिसरातील उद्योग, कृषी प्रक्रिया प्रकल्प, गोदामे, साठवणूक व वितरण केंद्रे तसेच लॉजिस्टिक सुविधांच्या विकासाला चालना मिळून नवीन गुंतवणूक आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील.
धुळे हा कृषिप्रधान जिल्हा असल्याने या कनेक्टिव्हिटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. जिल्ह्यातील विविध कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक व पुरवठा साखळीच्या विस्तारातून शेतमालाच्या मूल्यवर्धनालाही चालना मिळेल. मध्य भारतातील पर्यटन व धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ झाल्याने पर्यटन क्षेत्रासाठीही नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.
विकासासोबत शेतकऱ्यांचे हितही जपा
मनमाड-इंदूर प्रकल्पासाठी एकूण 1 हजार 937.991 हेक्टर जमीन आवश्यक असून हा मार्ग सहा जिल्ह्यांतील 143 गावांतून जाणार आहे. यात धुळे तालुक्यातील 9, शिंदखेड्यातील 8 आणि शिरपूरमधील 16 अशा जिल्ह्यातील 33 गावांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात 453.842 हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी 307.64 हेक्टर खासगी, 128.662 हेक्टर वन आणि 17.54 हेक्टर शासकीय जमीन आहे. गावनिहाय प्रलंबित बाबींची नोंद घेऊन संयुक्त मोजणी, भूसंपादन आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करावी, असे त्यांनी सांगितले.
विकासासाठी जमीन देणारा शेतकरी हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जमीन, झाडे, विहिरी, घरे किंवा अन्य मालमत्तेच्या मोबदल्याशी संबंधित एकही रास्त प्रकरण दुर्लक्षित राहू नये. प्रत्येक प्रश्नाकडे संबंधित कुटुंबाच्या उपजीविकेशी जोडलेला विषय म्हणून पाहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा. भूसंपादन व मोबदल्याची प्रक्रिया पारदर्शक ठेवून प्रकल्पाची गती आणि जमीनधारकांचे हित यांचा समतोल राखावा, असे पालकमंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
धुळे-नरडाणा प्रकल्पाच्या कामाला गती
धुळे (बोरविहीर)-नरडाणा रेल्वेमार्गाची भौतिक प्रगती 43 टक्के तर आर्थिक प्रगती 79.36 टक्के झाली असून सुधारित प्रकल्प खर्च ₹1 हजार 237.46 कोटी आहे. प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून उर्वरित कामांचे टप्पानिहाय नियोजन करून सर्व कामे समांतरपणे पुढे न्यावीत, असे त्यांनी सांगितले.
या मार्गावर बोरविहीर व नरडाणा या विद्यमान स्थानकांसह नवीन धुळे, निमखेडी, कापडणे आणि सोनगीर अशी चार नवीन स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात एक महत्त्वाचा पूल, 24 मोठे पूल, 39 लहान पूल, 2 रोड ओव्हर ब्रिज आणि 49 रोड अंडर ब्रिज/लो हाइट सब-वेचा समावेश आहे. ही कामे परिसरातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, व्यापार व दैनंदिन प्रवासासाठी अधिक सुलभ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार असल्याने कामांचा दर्जा व वेग कायम राखावा, असे त्यांनी नमूद केले.
प्रकल्पातील 24 मोठ्या पुलांपैकी 9 पूर्ण झाले असून 12 चे काम सुरू आहे. 39 लहान पुलांपैकी 24 पूर्ण तर 5 चे काम प्रगतिपथावर आहे. 49 रोड अंडर ब्रिजपैकी 24 पूर्ण झाले असून 9 चे काम सुरू आहे. पाच स्थानक इमारतींपैकी तीन इमारतींची कामे प्रगतिपथावर असून 8.64 किलोमीटर ट्रॅक लिंकिंग पूर्ण झाले आहे. मार्च 2028 चे उद्दिष्ट लक्षात घेऊन उर्वरित कामांना आवश्यक गती द्यावी, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.
पिंप्री, कुंडाणे, नायळोद, धमाणे, कापडणे, दापुरा व दापुरी परिसरातील जमीन ताबा, मोबदला, झाडे, विहिरी व अन्य मालमत्तेचे मूल्यांकन तसेच न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित अडचणी तपासून निकाली काढाव्यात. रेल्वेच्या नोंदीनुसार 14.15 हेक्टर तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार 12.69 हेक्टर जमीन ताब्यात मिळणे प्रलंबित असल्याने 1.46 हेक्टरची तफावत संयुक्तपणे पडताळून अंतिम आकडेवारी निश्चित करावी. मनमाड–इंदूर प्रकल्पातील 26 बोगद्यांसह भूसंपादन, वनविषयक मंजुरी आणि तांत्रिक बाबींची कार्यवाहीही समांतरपणे पुढे न्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनमाड-इंदूर आणि धुळे-नरडाणा हे दोन्ही रेल्वे प्रकल्प धुळे जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारे ठरणार आहेत. या रेल्वेमार्गांमुळे शेतमालाला नव्या बाजारपेठा, युवकांना रोजगार, उद्योगांना नवी गती आणि नागरिकांना देशाच्या विविध भागांशी अधिक सुलभ संपर्क उपलब्ध होईल. या विकासाचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविताना शेतकरी आणि नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.
०००
















WhatsApp