Home ताज्या बातम्या …घोड्याच्या जागी काठीवर बसून धावले पोलीस; व्हिडिओ व्हायरल

…घोड्याच्या जागी काठीवर बसून धावले पोलीस; व्हिडिओ व्हायरल

0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील पोलीस काही ना काही कारनाम्यांमुळे चर्चेत असतात. आता फिरोजाबादमधील पोलीस त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. पोलीस घोड्याच्या जागी, काठीवर बसून धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर सर्वच जण चक्रावून गेले आहेत की, पोलिसांना नक्की काय सांगायचं आहे. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फिरोजाबाद पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

मॉक ड्रिलअंतर्गत पोलीस प्रतिकात्मक घोड्याच्या माध्यमातून, गर्दी नियंत्रित करत आहेत. आणि यात वापरली गेलेली काठी प्रतिकात्मक घोड्याची भूमिका साकारत आहे, अशी प्रतिक्रिया खुद्द पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, मॉक ड्रिलच्या माध्यमातून पोलीस तयारी करत असल्याचं, पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. या मॉक ड्रिलमध्ये टीयर गॅस, लाठी चार्ज, शत्रूशी निपटण्याच्या मार्गांचा अभ्यास करण्यात आला. दरम्यान, पोलिसांकडून काठीचा प्रतिकात्मक घोड्यांच्या रुपात वापर केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पोलिसांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी नक्की हा काय प्रकार आहे हे समजू शकेल का, असा सवालही केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओला ट्रोल करण्यात आल्याने, फिरोजाबाद पोलिसांनी लगेचच या व्हिडिओबाबत ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. दंगलीचा सामना करण्यासाठी घोड्यावर बसलेल्या पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु जिल्ह्यात घोडेस्वार पोलीस नसल्याने, काठीचा प्रतिकात्मक घोडे म्हणून वापर केला असल्याचं फिरोजाबाद पोलिसांनी ट्विटद्वारे सांगितलं. पोलिसांच्या स्पष्टीकरणावरही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

अशाप्रकारे यूपी पोलीस पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाहीत. याआधीदेखील मॉक ड्रिलवेळी बंदूकीतून फायरिंग न झाल्याने आणि शत्रूला घाबरवण्यासाठी तोंडातून ‘ठाय-ठाय’ असा आवाज काढणारा पोलिसांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.