Home शहरे औरंगाबाद नशेच्या सवयीने बांधकाम मजूर बनला दुचाकी चोर

नशेच्या सवयीने बांधकाम मजूर बनला दुचाकी चोर

0

औरंगाबाद: नशापाणी करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातून  मोटारसायकली पळविणाऱ्या चोरट्याला मुकुंदवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने रविवारी (दि.१० ) रात्री अटक केली.  त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या.  या चोरट्याकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

रोहित दत्तू अंभोरे (२०,रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, स्वराजनगर येथील अमोल तोताराम बडक यांची मोटारसायकल चोरट्यांनी ९ रोजी रात्री चोरून नेली होती. याविषयी बडक यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राहुल बांगर, कर्मचारी कौतीक गोरे, कैलास काकड, असलम शेख,  सुनील पवार, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी तपास सुरू केला तेव्हा ११ रोजी रात्री संशयित तरूण दुचाकीवर बसून जाताना दिसला.

पोलिसांनी त्यास थांबवून त्याच्याकडील दुचाकीच्या मालकीसंबंधी कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. तेव्हा तो उडवा,उडवीची उत्तरे देवू लागला. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळील मोटारसायकल ९ रोजी रात्री त्याने स्वराजनगरातून चोरल्याची कबुली दिली. त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरल्याचे सांगून लपवून ठेवल्याचे सांगितले.  त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी आणखी दोन मोटारसायकली (क्रमांक एमएच-२०झेड ४९७२) आणि क्रमांक(एमएच२१- एच ६६०६)जप्त केल्या. आरोपीकडून मोटारसायकल चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

आरोपीस नशा करण्याची सवय 
आरोपी रोहित अंभोरे हा नशापाणी करण्याच्या सवयीचा आहे. तो बांधकाम मजूर म्हणून काम करतो. असे असले तरी व्यसन भागविण्यासाठी त्याने वाहनचोरीचा उद्योग सुरू केल्याचे पोलीस तपासात समोर आले. मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपीला काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र वाहनचोर म्हणून तो प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला.