Home ताज्या बातम्या दुर्घटनाग्रस्त क्रिपझो कंपनी बोगस ? नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांसह ग्रामस्थांचा वज्र निर्धार

दुर्घटनाग्रस्त क्रिपझो कंपनी बोगस ? नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांसह ग्रामस्थांचा वज्र निर्धार

0

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक परिसरामध्ये क्रिपझो कंपनीमध्ये दि. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये १८ जण जळून जखमी झाले होते. त्यांना उपचाराकरिता मुंबई या ठिकाणी हलविण्यात आले असता त्यातील आशिष येरूणकर रा. म्हसेवाडी, राकेश हळदे रा. उंबर्डी, कैलास पाडावे रा. शिरवली यांचा मृत्यू झाला. यावेळेस निजामपूर, विळे भागाड परिसरातील ग्रामस्थ कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात क्रिपझो कंपनी या ठिकाणी सदर घटनेत झालेल्या तिघांचे मृतदेह ताब्यात न घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या व शासकीय अधिकाऱ्यांची वाट पाहत बसले होते. त्यावेळेस माणगांव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर , तहसीलदार प्रियांका आयरे, पं. स. सभापती सुजित शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद, पो. नि. रामदास इंगवले हे आल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली असता ही कंपनी २०१५ पासून बेकायदेशीर रित्या चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कंपनीला फेब्रुवारी २०१९ ला रितसर मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते. टेस्टिंगची परवानगी देण्यात आली नव्हती. ही कंपनी बोगस असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या व जखमी असलेल्या तरुणांना कंपनी व्यवस्थापन जो पर्यत नुकसान भरपाई लेखी स्वरूपात देण्याचे कबूल करीत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. त्यावेळेस माणगांव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, कंपनीचे डायरेक्टर यांच्यासोबत संपर्क झालेला नाही. तरी या कंपनी व्यवस्थापनावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करण्यात येईल. या घटनेतील बाधित तरुणांना नुकसान भरपाई देण्याचा जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. तसेच संबंधित घटनेबाबत रायगड जिल्हा अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळेस उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगडचे फॅक्टरी इन्स्पेक्टर अंकुश खराडे व केशव केंद्रे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, या कंपनीला मशीन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते. त्यांना टेस्टिंग साठी परणावनगी देण्यात आली नव्हती. या घटनेत जखमी झालेल्या तरुणांच्या कुटुंबाना जास्तीत जास्त मदत शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल व कंपनी व्यवस्थापनचे मालक यांच्यावर अलिबाग येथील कोर्टामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.
यावेळेस उपस्थित सर्व ग्रामस्थ संतापून बोलले की, फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्यावर व कंपनी व्यवस्थापणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या औद्योगिक विभागामध्ये बऱ्याच प्रकारच्या अनधिकृत कंपन्या चालू असून त्यांनी शासनाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेतलेली नाही. याची साधी चौकशी सुद्धा संबंधित खाते करत नाही. हे आश्चर्य म्हणावे लागेल ! या औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक रुग्णालय, अग्निशमन दल यांची उणीव असल्याचे ग्रामस्थ बोलत होते.
यावेळेस माणगांव पो. नि. इंगवले यांनी सांगितले की, धरणे व कोटियन कंपनीचे डायरेक्टर यांच्याशी बोलणं झालं असून ते आज रात्री किंवा उद्या सकाळी येणार असल्याचे सांगितले. व यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल.
महाड माणगांव पोलादपूर विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली असता प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे मृत पावलेत व जखमी आहेत त्यांना प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळेस युवासेना नेते विकास गोगावले, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जनार्दन मानकर, सुधीर पवार, माणगांव मनसे तालुका अध्यक्ष सुबोध जाधव, संजय गायकवाड, सागर भालेराव व हजारो तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.