Home अश्रेणीबद्ध हायटेक गुन्हेगारीविरोधात बारामती पोलीस दक्ष

हायटेक गुन्हेगारीविरोधात बारामती पोलीस दक्ष

0

बारामती : सध्या ‘डिजिटल‘ युग सुरू आहे. वेळ, श्रम वाचविण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांना नागरिक पसंती देतात. शासनानेदेखील आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांचे महत्त्व वाढविले आहे. नलाइन व्यवहारांतून जीवन सुसह्य आणि जलद झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, त्याबरोबरच हायटेक चोरी, गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या हायटेक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बारामतीपोलिसांकडून नागरिकांना सायबर क्राइम जागृतीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
सर्वसामान्यांच्या विचारापलीकडे जाऊन सध्या गुन्हेगारी सुरु आहे. अनेकांना हायटेक पद्धतीने कोट्यवधीचा गंडा घातला गेला आहे. गुन्हेगारांच्या हायटेक चोरीच्या पद्धतीने पोलीसदेखील चक्रावून जातात. सायबर क्राईमला कार्यक्षेत्राची मर्यादा नाही. जगात कोठेही बसून हायटेक पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जाते. 
बारामती शहर पोलिसांनी याविरोधात जागृती सुरु केली आहे. शहरात नुकत्याच पार पडलेल्या एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मेळाव्यात पोलिसांनी यासाठी खास ‘स्टॉल’ उभारला होता. पोलीस कर्मचारी सिद्धेश पाटील यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. स्वतंत्र ‘स्क्रीन’द्वारे सायबर गुन्हेगारीच्या पद्धती नागरिकांना समजावून सांगितल्या. अनेकदा नागरिकांना खोटे फोन कॉल  येतात. मी बँक अधिकारी बोलत आहे, तुमचे कार्ड ब्लॉक होणार आहे, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे, तुमचा एटीएम कार्ड विविध माहिती द्या. ती कोणालाही देऊ नये, अशी पोलिसांनी सूचना केली. एटीएममध्ये पैसे काढताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश करू देऊ नका. एटीएम कार्डचा पासवर्ड टाकताना कुणालाही दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. 
डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वत: स्वाईप मशीनवर स्वाईप करावे. एटीएम कार्ड स्कीमर मशिनमधून स्वाईप होणार नाही याची काळजी घ्या. सोशल नेटवर्किंग साईटवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करु नये. कोणत्याही आमिषाला बळू पडू नये, असे आवाहन करण्यात आले.
अनेकदा विवाहविषयक संकेतस्थळावरुन लग्न करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी केली जाते. अनोळखी खात्यांवर सदरचे पैसे भरण्यास सांगितले जाते; यात आर्थिक फसवणूक केली जाते. लॉटरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकारदेखील वाढलेले आहेत. आपली जागा मोबाईल टॉवर लावण्यासाठी निवडली आहे, असे सांगून पैशांची मागणी केली जाते. 
नोकरी देण्याच्या कारणावरून खोटी फसवणुकीचे प्रकार घडतात. चिट फंड कंपनीत पैशाची गुंतवूणक करताना सावधानता बाळगावी. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, तारणाशिवाय ताबडतोब लोन मिळवून देतो, असे सांगून प्रक्रिया रक्कम बँक खात्यामध्ये जमा करा असे सांगितले जाते. अशा प्रकारे आपली फसवणूक होत असते, असे पोलिसांनी सांगितले. 
……….

केवळ अर्ध्या तासात ७० संदेश.. 
ऑनलाइन काहीही खरेदी केलेली नसताना बारामती येथील ओंकार कुलकर्णी यांना केवळ अर्ध्या तासात ७० संदेश आले आहेत. ऑनलाइन कोणतीही वस्तू मागविलेली नसताना  कुलकर्णी यांच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ संदेश पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका राष्ट्रीयकृत बँकेचा हजारो रुपये शिल्लक असल्याचा संदेश एका नागरिकाला आला. हा नागरिक त्या बँकेचा खातेदार नव्हता हे विशेष. याबाबत संबंधित नागरिकाने बँकेच्या ग्राहक प्रतिनिधीशी संपर्क साधला. या वेळी बँकेने हा प्रकार फसवणुकीचा आहे, असे सांगितले. अशा विविध प्रकारे फसवणूक होत आहे.