Home शहरे मुंबई वनराई व कुलाबा पोलिसांनी ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांच्या ऐवजांचा लावला शोध

वनराई व कुलाबा पोलिसांनी ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांच्या ऐवजांचा लावला शोध

0

परवेज शेख मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार वनराई व कुलाबा पोलिसांनी ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांच्या ऐवजांचा लावला शोध मुंबई गुन्ह्याचा तपास असो वा कर्तव्यापलीकडची कामगिरी… मुंबई पोलिसांची जगात तोड नाही. याचा प्रत्यय मुंबईतील वनराई व कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. ऑस्ट्रेलियन नागरिकाचा गहाळ झालेला लाखो रुपयांचा ऐवज काही तासात या पोलीस पथकांनी शोधून काढला. पोलिसांच्या या चांगल्या कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार झळकले.

मूळचे ऑस्ट्रेलिया देशाचे नागरिक असलेले अॅडम जॅक्सन हे आर्किटेकट असून, अबूधाबी येथे राहतात. ते कामानिमित्त गेल्या आठवड्यात भारतात आले होते. गोरेगाव परिसरातील फ्रेन हॉटेल येथे थांबले होते. दरम्यान, अॅडम हे गेट वे ऑफ इंडिया येथे गेले. तेथून पुन्हा हॉटेलमध्ये येण्यासाठी टॅक्सीत बसले. हॉटेलच्या गेटसमोर अॅडम टॅक्सीतून उतरले. गडबडीत ते लॅपटॉपची बॅग टॅक्सीत विसरले. बॅगेची आठवण होईपर्यंत टॅक्सी चालक तेथून निघून गेला. अॅडम यांनी तात्काळ वनराई पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक खरात व पोलीस उपनिरीक्षक शिरवाडकर यांनी अॅडम यांना तात्काळ बॅग शोधून देण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.


कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत घोणे यांनी पोलीस पथकासह फ्रेन हॉटेल येते आले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अॅडम ज्या टॅक्सीतून उतरले त्याचा क्रमांक निदर्शनास आला. त्यानुसार एमएच : 01/ सीआर – 8101 या क्रमांकावरून वनराई पोलिसांनी टॅक्सी मालक शिवशंकर कांबळे यांचा पत्ता शोधून काढला. ट्रक टर्मिनस येथील राहत्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र कांबळे वनराई पोलिसांना भेटले नाही.


दरम्यान, सपोनि भारत घोणे यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या (102 बॅचचे) बॅचमेट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गावडे यांना सदर हकीगत सांगितली. कुलाबा पोलीस ठाण्याचे सपोनि गावडे व वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अखेर टॅक्सी चालकाचा शोध घेतला. टॅक्सीत विसरलेली अॅडम यांची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत 1500 अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलन 10 लाख 65 हजार रुपये) निकॉन डी810 क्रमांकाचा डीएलएसआर कॅमेरा, निकॉन 70 : 200 कॅमेरा लेन्स, निकॉन 50 एमएमचे लेन्स, टॅमरॉन 24 : 70 एमएम कॅमेरा लेन्स, रोस वॉच असा लाखो रुपयांचा मुद्देमाल होता. गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अॅडम जॅक्सन यांनी वनराई व कुलाबा पोलिसांचे आभार मानून मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.


ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मुद्देमाल उत्तर प्रादेशिक विभागाचे सह पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ 12 चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीतेंद्र भावसार, पोलीस निरीक्षक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलीस ठाण्याचे सपोनि भारत घोणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले, पोलीस शिपाई कैलास मोरे व कुलाबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, पोलीस नाईक अंबुरे, पोलीस नाईक रवी बिराडे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई प्रशांत शेलार आदी पथकांनी संयुक्तरीत्या शोधून काढला.