Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार; टोमॅटो 400 पार

पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार; टोमॅटो 400 पार

0

कराची : पाकिस्तानी नवरीने लग्नात टोमॅटोचे दागिने घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील लोक टोमॅटोला सोन्यासारखंच महत्त्व देऊ लागले आहेत. कारण तब्बल 400 रुपये प्रति किलोने पाकिस्तानात टोमॅटो विकले जात आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे लोक त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. 

पाकिस्तानमधील टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला आहे. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून टोमॅटो 300 रुपये प्रति किलो विकला जात होता. पण आता या किंमतीत वाढ होऊन 400 रुपये झाल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. 

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने इराणवरुन 4500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला होता. पण आतापर्यंत फक्त 989 टन टोमॅटो पाकिस्तानात पोहचला आहे. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका नवरीने टोमॅटोचे दागिने घातले आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पत्रकार नायला यांनी लिहिले आहे की, ‘टोमॅटोचे दागिने…तुम्हाला असं वाटतं का की, तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही पाहिलंय…’. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. 

https://twitter.com/nailainayat/status/1196512658440278018

या व्हिडीओमधे दिसणारी नवरी म्हणाली की, तिच्या देशात टोमॅटो आणि पाइन नट्सची किंमत सोन्यासारखी झाली आहे. हेच कारण आहे की, तिने सोन्याऐवजी टोमॅटोचे दागिने घातले आहेत. ती म्हणाली की, तिच्या भावाने तिला पाइन नट्स गिफ्ट दिले आहेत. तर तिच्या आई-वडिलांनी तीन सूटकेस भरून टोमॅटो दिले आहेत. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर मजेदार कमेंटही बघायला मिळत आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापारावर बंदी घालणं चांगलंच महागात पडत आहे. पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. भारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतः हून बंद केली आहे. त्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील ‘द न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनात घट झाली आहे. पाकिस्तानला स्वतः ची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातून महाग कापूस आयात करावा लागू शकतो. तसेच पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनच्या (पीसीजीए) आकडेवारीचा हवाला देत सूत उत्पादनात 26.54 टक्क्यांची घसरण झाल्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला होता.