Home बातम्या देवेंद्र फडणवीस, अजितदादा, भुजबळ, वळसे-पाटील विधानभवनात एकत्र भेटले… सगळेच चक्रावले!

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, भुजबळ, वळसे-पाटील विधानभवनात एकत्र भेटले… सगळेच चक्रावले!

0

मुंबई: राज्यातील राष्ट्रपती राजवट हटून सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच काही सुटलेला नाही. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुमत नसतानाही बेकायदेशीरपणे सरकार स्थापन केल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने केला आहे. त्यासाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतलीय. राज्यात तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश द्यावेत, हंगामी अध्यक्ष निवडून ही चाचणी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आपापली ताकद दाखवण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. असं असतानाच, आज विधानभवनात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील एकत्र दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 35व्या पुण्यतिथी सोहळा निमित्त विधानभवनातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी छगन भुजबळ व दिलीप वळसे- पाटील सहभागी झाले होते.

अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. आज पुन्हा छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता तरी त्यांना बंड थंड करण्यासाठी यश येणार की अपयश याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली, ती सर्व कागदपत्रं न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या याचिकेवर उद्या (मंगळवारी) अंतिम सुनावणी होणार आहे.