Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

0

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र अद्यापही काही आमदार संपर्कात नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालेली असतानाच राष्ट्रवादीचे कळवणचे आमदार नितीन अर्जुन पवार हरविल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसात केली आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर आमदार हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करून आमदार नितीन पवार हरविल्याची माहिती देतानाच तक्रार अर्जही ट्विटरवर पोस्ट केला आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नितीन पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार याने ही तक्रार केली आहे. पवार हे २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे सहा वाजता पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला जातो असं सांगून घरातून निघून गेले. ते अद्याप घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नसून त्यांनीही संपर्क साधला नसल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितला सुटकेचा थरार

या तक्रारीत आमदार पवार यांचं वर्णनही करण्यात आलं आहे. घरातून निघताना पांढऱ्या रंगाचा आणि फुल बाहिचा शर्ट तसेच काळी पँट घालून ते निघाल्याचे या तक्रारीत म्हटलं आहे. मध्यम शरीरयष्टी असलेल्या पवार यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत असल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पवार हे नेमके गेले कुठे? असा सवाल यावेळी करण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आज सकाळी राज्यापालांना भेटून त्यांच्या आमदारांच्या सह्यांची एक यादी राज्यपालांना सादर केली आहे. या यादीत पवार यांचं नाव असलं तरी त्यांची त्यावर सही नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलातही पवार नसल्याने पवार नेमके गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.