Home पोलीस घडामोडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही माणूस म्हणून समजा

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही माणूस म्हणून समजा

0

मुंबई:विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांचे पती आजारी असताना देखभालीसाठी त्यांना रजा मिळाली नाही़. पर्यायी सेवेवर हजर राहणे भाग पडले. कामावर असताना पतीच्या निधनाची बातमी कानावर पडली. या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही माणूस समजा, अशी एक पोस्ट एका महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाली.

‘पोलीस खात्यात वेगवेगळ्या पदांवर काम करणारे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करण्याचे स्वप्न पाहतात. या जबाबदारीच्या पदावर नेमणूक झाल्यानंतर ते दिवस-रात्र कामात व्यस्त होत असतात. बंदोबस्त, नाकाबंदी कोम्बिंग, ऑल आउट ऑपरेशन, वरिष्ठांची भेट, कोर्ट यामुळे घरी पोहोचण्यास रोजच उशीर होतो. नेहमीचे सणवार, उत्सव-जयंती मिरवणुका, सभा, भाषणे तर कधी निदर्शने हे सर्व शांततेने पार पाडले जावेत, यासाठी वरिष्ठांच्या सूचना, कायदा व सुव्यवस्था बैठका, नियमित मीटिंग, भेटी, महत्त्वाचे फोन व सर्व प्रकारचे बंदोबस्त हे न संपणारे सत्र चालूच राहते. घरातील लोक आपल्याच माणसाशी दोन शब्दही न बोलता जगू शकतात का? त्यात घरातली एखादी व्यक्ती आजारी असते, पण ते सांगताही येत नाही किंवा औषधोपचार करायलाही वेळ मिळत नाही. घरी कितीही गंभीर परिस्थिती असली, तरी कामावर हजर राहावेच लागते. असे म्हणत, त्यांनी मांडवे यांच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

अलका मांडवे गेली पाच वर्षे सानपाडा ते विलेपार्ले असाच प्रवास करून काम करत आहेत. रोज घरी त्या १२ ते २ वाजता तर कधी-कधी रात्री साडेचार वाजता जात होत्या. सकाळी ९ वाजता परत पोलीस ठाण्यात हजर होतात. त्यांना साप्ताहिक सुट्टीही गेल्या कित्येक दिवसांत मिळाली नाही. गेले चार महिने सतत निरनिराळे बंदोबस्त, यामुळे घराकडे मुलांकडे, संसाराकडे आणि पतीकडे जराही लक्ष देता आले नाही. पतीच्या उपचारासाठी मागितलेली रजा मिळाली नाही. त्यामुळे नाइलाजाने नोकरीवर हजर झाल्या आणि पोलीस स्टेशनला काम करत असताना पतीच्या निधनाची बातमी कानावर आली.

गेले चार महिने त्यांना त्यांच्या पतीशी धड बोलताही आले नाही की, त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची चौकशीही करता आली नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करताना, वरिष्ठ अधिकारीही एक माणूस आहे हे विसरून जातात, ही अत्यंत खेदाची गोष्ट असल्याचे पोस्टमध्ये नमूद केले आहे. कोणीतरी माणूस म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे बघणार आहे का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न सध्या मला भेडसावत आहेत, याच्यावर कोणाकडे काही उत्तर आहे का हो? असा सवाल करत, एका महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची पोस्ट पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली. याबाबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत त्यांनी उत्तर दिले नाही.