Home ताज्या बातम्या त्या सहायक महिला पोलीस उपनिरीक्षकामुळे आम्ही त्रस्त

त्या सहायक महिला पोलीस उपनिरीक्षकामुळे आम्ही त्रस्त

0

नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सहा. महिला पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या पदाचा गैरवापर करून आम्हालाच प्रताडित करतात. वेळोवेळी त्या पोलीस असल्याचा धाक दाखवितात. आम्ही त्यांच्यामुळे त्रस्त आहो, अशी तक्रार रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना केली.
१७ नोव्हेंबर रोजी डिम्पल नायडू यांना कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र या प्रकरणात डिम्पल नायडू यांनी केलेले आरोप हे चुकीचे असल्याचे रजत देशमुख यांनी आयुक्तांना सांगितले. रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे असलेले कुत्रे हे त्यांचा साळा विजयेंद्र प्रतापसिंह यांनी त्याची मैत्रीण स्नेहल पीटर यांच्याकडून काही दिवसांसाठी ठेवण्यास आणले होते. मात्र कुत्र्यावरून डिम्पल नायडू या भांडण करीत होत्या. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी रजत देशमुख त्यांची पत्नी व मुलगी कुत्र्यांना सोडण्यासाठी जात होते. दरम्यान पार्किंगमध्ये डिम्पल नायडू आल्या त्यांनी परत भांडण करायला सुरुवात केली. त्यांनी कुत्र्यांना लाथ मारली. कुत्र्याच्या डोक्यावर दांडूही मारला. माझ्या मुलीलाही ढकलून दिले. त्यामुळे कुत्रे खवळल्याने त्यांचा चावा घेतला. त्यांचे पतीही खाली आले. त्यांनीही कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांनाही चावा घेतला. आम्ही त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगितले. घटनेनंतर कुत्रे साळ्याकडे सोडल्यानंतर त्यांना बघण्यासाठी दवाखान्यातसुद्धा गेलो. परंतु तिथेही त्यांनी भांडण केले. आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेला वृत्तपत्राने दिलेल्या प्रसिद्धीमुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. समाजात व परिसरात बदनामी झाली आहे.

माझा शेखुशी संबंध नाही
चावा घेतलेले कुत्रे हे कुख्यात शेखु यांचे असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याच्याशी माझा संबंध जोडल्या जात आहे. मुळात हे कुत्रे माझे नाही. साळ्याने ते आमच्याकडे त्याची मैत्रीण स्नेहल पीटर हिच्याकडून ठेवण्यासाठी आणले होते. स्नेहलशी आमचा कुठलाही संबंध नाही. मला कुत्र्यांच्या बाबतीत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी कुत्रे साळ्याकडे सोडून दिले. पोलिसांनाही चौकशी केली असता, साळ्याने आणल्याचेच सांगितले.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
डिम्पल नायडू यांनी लावलेल्या खोट्या आरोपांमुळे समाजात असलेली आमची प्रतिमा मलीन झाली आहे. समाजात, परिसरात आमच्यावर दोषारोपण करण्यात येत आहे. आमच्या मुलीला त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे डिम्पल नायडू व त्यांचे पती यांच्याविरुद्ध अब्रू नुकसान, प्रतिमा मलीन करणे तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे रजत देशमुख यांनी सांगितले.