Home बातम्या ​’अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय’

​’अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय’

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चूक झाल्याचं मान्य केलं असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना माफही केलं आहे, अशी माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी ८० तासांनंतर पदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. अजित यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं होतं. अजित पवार यांचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते. दुसरीकडे अजित हे पुन्हा परत येतील अशी आशा शरद पवार यांना होती. अखेर नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अजित पवार परत आले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या ८० तासांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांचं पक्षातील स्थान कायम राहील काय? आणि त्यांना राज्यात स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल काय, याबाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अजित पवारांबाबतची पक्षाची भूमिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली आहे. ‘अजित पवार यांनी सरतेशेवटी आपली चूक कबूल केली आहे. हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहे आणि शरद पवार यांनी त्यांना माफ सुद्धा केलं आहे. अजित पवार यांचं पक्षातील स्थान बदलण्यात आलेलं नाही, ते कायम राहील,’ असं मलिक यांनी सांगितलं.