Home गुन्हा धक्कादायक! मटार महाग विकल्याच्या रागात भाजी विक्रेत्याची हत्या

धक्कादायक! मटार महाग विकल्याच्या रागात भाजी विक्रेत्याची हत्या

0

मुंबई : अवकाळी पाऊस, त्यात पिकांच्या झालेल्या नासाडीमुळे भाज्यांचे भाव कडाडले. यातच, मटार जास्त भावाने विकत असल्याच्या रागात ग्राहकाने भाजी विक्रेत्याची हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये सोमवारी घडली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अभिषेक धुमाळ (२२) आणि साहिल खराडे (१९) या दोघांना अटक केली आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सायन-पनवेल हायवे ब्रिजखाली रामखिलान यादव (३०) हे भाजी विक्री करीत होते. त्यांनी मटारचे १० रुपयांचे छोटे-छोटे वाटे करून विक्रीसाठी ठेवले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास धुमाळ आणि खराडे तेथे आले. त्यांनी, मटारचा वाटा घेत त्यात आणखी मटार टाकण्यास सांगितले. मात्र भाजी महाग असल्याचे सांगत यादवने नकार दिला. जास्त भावाने मटार विकत असल्याच्या रागात दोघांनी त्याच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनी यादवला बेदम मारहाण केली. एकाने पट्ट्याने मारहाण केली. या मारहाणीत यादव गंभीर जखमी होत बेशुद्ध झाले. त्यांना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यादव यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार, पोलिसांनी तपासाअंती धुमाळ व खराडे दोघांनाही अटक केली. दोघेही आंबेडकरनगर येथील रहिवासी असून मामा-भाचे आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली.