Home ताज्या बातम्या शहराला ‘अँटी ड्रोन’ कधी मिळणार?

शहराला ‘अँटी ड्रोन’ कधी मिळणार?

0

पुणे : आगामी काळात दहशतवाद्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ले केले जाण्याची शक्यता नेहमी वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा ड्रोनचा यशस्वी सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘अँटी ड्रोन’ हे उपकरण घेतले आहे. पुणेदेखील राज्यातील एक महत्त्वाचे शहर असल्यामुळे येथेही ड्रोन हल्ल्याची भीती आहे; मात्र तरीही शहर पोलिसांकडे ड्रोन हल्ला परतवून लाण्याची क्षमता अद्याप आलेली नाही. त्यामुळे पुण्याला ‘अँटी ड्रोन’ कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आवश्यकता भासल्यास मुंबई पोलिसांचीच मदत घ्यावी लागणार आहे.

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अत्याधुनिक शस्त्र, तंत्रज्ञानाचा वापर, पोलिसांना सुविधा देण्यावर मोठी चर्चा झाली. त्यानंतर अनेक शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. दहशतवाद्यांशी लढा देतील, असे प्रशिक्षित कमांडो तयार करण्यात आले. पण, तंत्रज्ञानात बदल होत आहेत. त्यानुसार पोलिस दलातदेखील तंत्रज्ञानात बदल होण्याची आवश्यकता आहे. गुप्तचर यंत्रणांना माग लागू नये म्हणून देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडे ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला असून, सहा लाखांपेक्षा जास्त योग्य नोंदी नसलेले ड्रोन देशात असल्याची माहिती एका अभ्यासात नुकतीच समोर आली होती. या ड्रोनचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर होऊ शकतो, असे समोर आले होते.

पंजाबमध्ये पाकिस्तानने ड्रोनद्वारे शस्त्रतस्करी केल्याचे आढळून आले होते. तसेच, सौदी अरेबियामध्येदेखील तेल प्रकल्पावर ड्रोनद्वारे हल्ले केले होते. आपल्याकडे देखील ड्रोनद्वारे हल्ला होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणांनी उपाययोजनाला सुरुवात केली आहे. सध्या फक्त मुंबई पोलिसांकडे अँटी ड्रोनची सुविधा देण्यात आली आहे.

मुंबईनंतर पुणे हे नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिले आहे. तसेच, पुण्यात लष्करी दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत. तसेच, परदेशी नागरिक, महत्त्वाच्या कंपन्या, विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी मोठी आहे. तसेच, पुण्यात देखील ड्रोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ड्रोन वापरासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. पण, एखादा संशयास्पद ड्रोन आढळून आल्यास त्याला निकामी करण्याची यंत्रणा सध्या तरी पुणे पोलिसांकडे नाही. ड्रोनद्वारे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला रोखण्यासाठी पुणे पोलिसांना मुंबई पोलिसांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी बराच वेळ जाईल. त्यामुळे पुणे पोलिसांना देखील अँटी ड्रोनची आवश्यकता आहे. पण, या उपकरणाची किंमत जास्त असल्यामुळे त्याकडे दुलक्ष केले जाते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ड्रोनहल्ला परतविणाऱ्या यंत्रणा

संशयास्पद ड्रोनना लगाम घालण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्कायवॉल यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ‘ड्रोन गन’मुळे दोन किलोमीटरपर्यंत रेडिओ व जीपीएस सिग्नल जॅम करता येतात. ऑस्ट्रेलियामध्ये हे तंत्र परिणामकारकपणे वापरण्यात येत आहे. तर, स्काय फेन्स यंत्रणेमध्ये सिग्नलमध्येच हस्तक्षेप करत, त्या ड्रोनना संभाव्य क्षेत्रामध्ये येण्यापासून रोखण्यात येते. संशयास्पद ड्रोन हवेमध्येच लेझरच्या झोताद्वारे नष्ट करण्याच्या दृष्टीने अँथेना हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. अमेरिकेच्या लष्कराने त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत; मात्र या तंत्रज्ञानासाठी मोठा खर्च येतो.